सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळूबाई देवीची (मांढरदेवीच्या) जानेवारी महिन्यात यात्रा आहे. मात्र, राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अपूर्ण व कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका बसणार आहे.
मांढरदेवीला जाण्यासाठी उत्तर बाजूला असलेल्या भोर (जि.पुणे) वरून आणि पश्चिम बाजूला असलेल्या वाई (जि. सातारा) वरून असे दोन मार्ग आहेत. परंतु या दोन्ही मार्गावरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. भोर बाजूकडील अंबाडखींड घाट आणि वाईच्या बाजूकडील घाटातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे.
कापूरहोळ-भोर-मांढरदेवी-वाई-सुरुर या मार्गाच्या कामासाठी सुमारे १ कोटी ३० लाख रुपये खर्च आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कापूरहोळपासून कामास सुरुवात झाली. तरीदेखील भोर शहरापर्यंतचेही काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.
दरम्यान, भोर पोलिसांनी मागील आठवड्यात भोर-मांढरदेवी मार्गावरील वाहतुकीबाबत असलेल्या समस्या तालुका प्रशासनाला कळविल्या आहेत. त्यामुळे प्रशासन काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाईला जाणारी वाहतूक तीन महिन्यांपासून बंद
भोर ते मांढरदेवी मार्गावरील अंबाडे रस्त्यावर केवळ काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे, मात्र अनेक ठिकाणी १०० ते ३०० मीटरचे काँक्रिटीकरण, छोटे पूल व मो-या आणि गावांना जोडणाऱ्या सेवारस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. सध्या अंबाडखींड घाटातील काँक्रिटी करणाचे काम सुरू आहे. परंतु हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. रस्त्याच्या कामामुळे भोरहून मांढरदेवीमार्गे वाईला जाणारी वाहतूक तीन महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. तरीदेखील कामे पूर्ण झालेली नाहीत.