सातारा प्रतिनिधी । राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातील चार नेते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असताना राज्याच्या प्रमुखपदाची भूमिका बजावली. तर, बाबासाहेब भोसले आणि एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील मात्र, त्यांना देखील राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघात नऊ आमदार निवडणूक लढवत असून या सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीत कुणाच्या अंगांवर विजयाचा गुलाल पडणार आणि कुणा कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या सर्वच मतदारसंघात एकूण १०९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पण, खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीतच होत आहे. तरीही पाटण आणि वाई विधानसभा मतदारसंघात बंडखोरांनी चांगलीच रंगत आणली आहे. या दोन्ही मतदार संघात बंडखोरांनी चांगलेच रान तापवलं आहे. त्यामुळे संबंधित बंडखोर राजकीय गणिते बदलून कोणाचा फायदा करणार का? कि स्वत:च बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे.
वाई विधानसभा मतदारसंघ : वाई विधानसभा मतदार संघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान आमदार मकरंद पाटील उभे असून त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अरुणादेवी पिसाळ या निवडणूक लढवत आहेत. तर अपक्ष म्हणून पुरुषोत्तम जाधव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अरुणादेवी पिसाळ या कै. मदनराव पिसाळ यांच्या सून असून मकरंद आबांपुढे त्यांचं कडवं आव्हान आहे. जर पुरुषोत्तम जाधव यांच्यामुळे मकरंद आबा यांना निवणूक जड जाणार आहे.
सातारा विधानसभा मतदार संघ : सातारा मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपकडून पुन्हा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवेंद्रराजे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने अमित कदम मैदानात उतरलेत. आधीच शिवेंद्रराजेंचा एकहाती दबदबा, त्यात उदयनराजेंची साथ आहे. तरीही कदम यांना महा विकास आघाडीची किती ताकद मिळणार हे पहावे लागणार आहे.
कोरेगाव विधानसभा मतदार संघ : कोरेगाव मतदारसंघात दोन शिंदेंमध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे महेश शिंदे शड्डू ठोकून तयार आहेत. कोरेगाव मतदारसंघात यंदाही काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा शिवसेनेकडून मैदानात उतरलेल्या महेश शिंदे यांनी पराभव केला. आता दोघेही पुन्हा समोरासमोर आलेत. शिंदेसेनेकडून आमदार महेश शिंदे रिंगणात आहेत. तर विरोधातील शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत.
माण खटाव विधानसभा मतदार संघ : माण खटाव मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे चाैथ्या विजयासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे उतरलेत. याठिकाणी घार्गे यांच्या पाठीशी मोठ्या नेत्यांची ताकद उभी आहे. पण, येथे आघाडीतील नाराज शेखर गोरे आता बंधू विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत गेले आहेत. शेखर गोरेंनी कालपासून बंधू जयकुमार गोरे यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. आता दोन्ही गोरे बंधू एकत्रित आल्याने घार्गे यांच्यासाठी हि निवडणूक जाड जाणार हे नक्की.
फलटण विधानसभा मतदार संघ : फलटणमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार दीपक चव्हाण चौकार ठोकण्याच्या तयारीत आहेत. दीपक चव्हाण हे फलटणचे विद्यमान आमदार असले तरी रामराजेच फलटणचे किंगमेकर राहिलेत हे वेगळं सांगायला नको. विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सचिन कांबळे-पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. पण, या मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच कस लागणार आहे. दोघेही दोन उमेदवारांच्या पाठीशी आहेत. दोघांसाठीही लढत प्रतिष्ठेची बनली आहे.
पाटण विधानसभा मतदार संघ : पाटण मतदारसंघात शिंदेसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे आता हॅटट्रिक मारण्याच्या तयारीत आहेत. या ठिकाणी दोन सेना समोरासमोर उभ्या थकलेल्या आहेत. उद्धवसेनेकडून हर्षद कदम आहेत. तरीही महाविकास आघाडीतील बंडखोर सत्यजितसिंह पाटणकर यांनी पालकमंत्र्यांपुढे आव्हान उभे केले आहे. सत्यजित पाटणकर यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शंभूराज देसाई यांच्यासाठी सोप्पा असलेला पेपर आता अवघड बनला आहे. हर्षद कदम आणि शंभूराज देसाई या लढाईत शिवसेनेच्या मतात विभागणी होईल आणि त्याचा थेट फायदा पाटणकरांना होईल असं बोललं जात आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघ : कराड उत्तर विधानसभा मतदार संघात राष्ट्र्रवादी शरदचंद्र शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे असा सामना आहे. बाळासाहेब पाटील आत्तापर्यंत पाचवेळा कराड उत्तरचे आमदार राहिलेत. मात्र, यंदाची त्यांच्यासाठी सोप्पी नक्कीच नाही. या ठिकाणी ‘मनो”धैर्य’ एकवटल्याने बाळासाहेबांना या निवडणुकीत चांगलीच कसरत करावी लागत आहे. मतदारांची नाराजी असणं आणि मतदारसंघात भाजपचं तयार झालेलं वातावरण यामुळे उत्तरेत यंदा कमळ फुलणार असल्याचे दिसत आहे. मात्र, बाळासाहेब पाटील यांचे अस्तित्व पणाला लागले आहे हे नक्की.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ : कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण आमदारकीची निवणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून अतुल भोसले रिंगणात आहेत. अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असून साखर कारखाने, हॉस्पिटल, बँका, शाळा- कॉलेजेस या माध्यमातून भोसले कुटुंब थेट जनतेशी कनेक्टेड आहे. त्यामुळे यंदाही कराड दक्षिणेत काटे कि लढाई होणार आहे. या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.