कराडात तोतया पोलिसांनी महिलेचे साडेपाच लाखाचे दागिने केले लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । “मी कराड शहर पोलीस ठाण्याचा अधिकारी आहे. काल येथे सविता नावचे महिलेचा सोन्याच्या दागिन्यासाठी खून झाला आहे. आणि तुम्ही इतके सोन्याचे दागिने घालून कशाला फिरता, सोन्याचे दागिने काढून ठेवा,” असे सांगत महिलेचे साडेपाच लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन दोघांनी पोबारा केल्याची घटना कराड शहर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या शाहू चौकात घडली. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर संबंधित महिलेने थेट पोलीस ठाणे गाठत याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड येथील मुळीक गल्ली, शनिवार पेठमधील मंगल बेंद्रे (वय ६३) या शाहू चौक येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरून निघाल्या होत्या. यावेळी ३५ ते ४० वर्ष वयोगटातील एकाने मंगल बेंद्रे यांना हाक मारली. तेव्हा बेंद्रे यांनी त्यास काय असे विचारले असता त्याने रस्त्याच्यापलीकडे उभे राहिलेल्या इसमाकडे बोट दाखवून “ते साहेब काय म्हणतात ते ऐका,” असे सांगितले. त्यानंतर बेंद्रे या रस्त्याचे पलीकडे उभा असलेल्या इसमाकडे गेल्या तेव्हा त्याने “मी कराड शहर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी शिंदे आहे, काल येथे सविता नावचे महिलेचा सोन्याच्या दागिन्यासाठी खून झाला आहे. आणि तुम्ही इतके सोन्याचे दागिने घालून कशाला फिरता, सोन्याचे दागिने काढून ठेवा,” असे म्हणून त्याने त्याचे खिशातील रूमाल काढून त्यामध्ये दागिने काढून ठेवण्यास सांगितले.

त्यावेळी बेंद्रे यांनी त्यांच्याकडील १ लाख ९० हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्या, २ लाख ४४ हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ८५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण, २० हजार रूपये किमतीची सोन्याची चैन असा एकूण ५ लाख ३९ हजार रूपये किमतीचे दागिने काढून तोतया पोलिसाने ते रूमालात ठेवून रूमालाची गाठ मारून ती पिशवीत ठेवली व ती पिशवी घेऊन तुम्ही घरी जावा असे सांगितले. त्यानंतर दैत्यनिवारणी येथे बेंद्रे गेल्या असता त्यांनी पिशवीमध्ये पाहिले असता त्यांचे दागिने नव्हते. यानंतर मंगल शशिकांत बेंद्रे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी तोतया पोलिसांवर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.