कराड प्रतिनिधी | येथील जुन्या कोयना पुलाखाली आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे मृताचे रेखाचित्र (स्केच) जारी करण्यात आले आहे. संबंधिताबद्दल कोणास काही माहिती असल्यास कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोयना नदीपात्रात शुक्रवारी रात्री ३५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या गळ्यावर वार असल्याने घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरचा मृतदेह हा चष्मे विक्री करणाऱ्या इराणी समाजातील पुरूषाचा असावा, असा निष्कर्ष समोर आला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी माहिती घ्यायला सुरुवात केली आहे.
खून करून मृतदेह आणून टाकल्याचा संशय
अज्ञातांनी दुसरीकडे खून करून मृतदेह कराडच्या कोयना नदीपात्रात आणून टाकल्याचा संशय आहे. सिमेंटच्या पाईपला मृतदेह बांधल्याचे आढळून आले. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे घटनास्थळीच स्पष्ट झाले होते. मात्र, मृतदेहाची ओळख न पटल्याने रेखाचित्र (स्केच) तयार करण्यात आले. स्केचवरून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील, अर्जुन चोरगे यांना तपासाबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांचे पथक खबऱ्याकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.