‘7 हजार रुपये द्या घरातील भांडणे दैवी शक्तीने सोडवतो,’ म्हणणारा जंगू बाबा अडकला सापळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । घरावर पितृदोष असून कोणीतरी करणी- भानामती केली आहे. हा दोष काढण्याचे आश्वासन देऊन 3 हजार 500 रुपयांना गंडा घालणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील अंभेरीतील भोंदू बाबाला रहिमतपूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जंगू अब्दुल मुलाणी (वय 72, रा.अंभेरी, ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रहिमतपूर येथील सुभाषचंद्र आप्पासो मदने (वय 67) यांच्या घरात गेली अनेक वर्षे कौटुंबिक वाद विवाद चालू आहे. या त्रासातून मार्ग काढण्यासाठी कुणाकडून योग्य मार्गदर्शन मिळतोय का? याचा प्रयत्न ते करत होते. या दरम्यान त्यांना कुणीतरी अंभेरी येथील परिसरात प्रसिद्ध असलेले बाबा जंगू अब्दुल मुलाणी याच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. या बाबाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याची प्रत्यक्ष भेट घेण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी बाबाची त्यांनी भेट घेतली.

भेट घेतल्यानंतर त्याने सुभाषचंद्र मदने यांना त्यांच्या घरातील भांडणे दैवी शक्तीने सोडवणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, यासाठी 10 हजार खर्च होईल मात्र तुमची परिस्थिती पाहून 7 हजारात काम करणार असल्याचे सांगितले. घरावर केलेली करणी व भानामती काढून पितृदोष दूर करण्यासाठी वाळू, पाणी व उडीद यांचे मिश्रण करून घराभोवती टाकण्यास सांगितले. तसेच घरातील जेवणामध्ये अंगारा टाकण्यास दिला व लिंबाचा अंगारा लावून घरावरून उतरून टाकण्यास सांगितले. यासाठी सुभाषचंद्र मदने यांच्याकडून बाबाने वेळोवेळी 3 हजार 500 रुपये घेतले.

मात्र, एवढे पैसे देऊन व सांगितलेले उपाय करूनही सुभाषचंद्र मदने यांना अपेक्षित फरक जाणवला नाही. अंभेरीच्या बाबांनी आपली फसवणूक केल्याची जाणीव झाल्यानंतर मदने यांनी अनिसकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख आणि डॉ. हमीद दाभोलकर यांच्या मार्गदर्शनानुसार रहिमतपूर व पिंपरी येथील अनिसचे कार्यकर्ते व रहिमतपूर पोलिसांनी सापळा रचून भोंदू बाबा जंगु मुलाणी याला बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास रहिमतपूर – वाठार रस्ता लगत असलेल्या एका गॅरेज मध्ये रंगेहात पकडले.

रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार भोंदू बाबावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत अनिसचे कार्यकर्ते शंकर कणसे, डॉ. दिपक माने, भगवान रणदिवे, मधुकर माने, सिताराम चाळके, सिताराम माने, चंद्रहार माने तसेच पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. खुडे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार काळंगे आदी कर्मचारी सहभागी झाले होते. तपास पोलीस उपनिरीक्षक खुडे करत आहेत.