कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील टेंभू धरणावरून चोरीस गेलेले अॅन्टीव्हॅक्युम व्हॉल्व्हची चोरी करणाऱ्या चोरट्यास कराड तालुका पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बापूराव रघुनाथ मदने (वय ३६, रा. टेंभू, ता. कराड) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, कराड तालुक्यातील महत्वाच्या योजनापैकी एक असलेल्या टेंभू पाणी योजनेच्या पाइपला १२ अॅन्टीव्हॅक्युम व्हॉल्व्ह वॉलमधील पितळी १२ बुशची गेल्या काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित बापूराव मदनेला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर चोरी कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ४ अॅन्टीव्हॅक्युम व्हॉल्व्ह आणि दुचाकी असा ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक केली.
पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बी. एस. कांबळे, पोलिस अंमलदार सचिन निकम, उत्तम कोळी, सज्जन जगताप, नितीन येळवे यांनी या धाडसी कारवाईमध्ये सहभाग घेतला.