सातारा प्रतिनिधी | पती संशयित नजरेने पाहून सतत वादावादी करत असल्याने आठ महिन्यांपासून माहेरी रहात असलेल्या पत्नीचा खून करण्यासाठी आलेल्या पतीला भुईंज पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
स्वप्निल वालचंद सोनावणे (रा. नायगाव ता. दौंड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे येथील गौरी सोनवणे हिचे दौंड तालुक्यातील नायगाव स्वप्निल सोनावणे याच्याशी पाच वर्षापूर्वी लग्न झाले आहे. मात्र, त्यांचे पटत नसल्याने गौरी ही 8 महिन्यांपासून माहेरी राहते. स्वप्निलही काही दिवस सासुरवाडीत येवून राहिला. मात्र, तो गौरीवर संशय घेवून वाद घालत होता. याची माहिती गौरी हिने स्वप्निलच्या आई-वडीलांना याची माहिती दिली. याच कारणारून दोघांचा वाद झाला होता.
यानंतर दि. 9 रोजी स्वप्निल हा गौरीकडे येऊन घरात घुसून कोयता दाखवत गौरीला जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. यावेळी घरातच आतील रूममध्ये असलेल्या गौरीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेवून पोलिसांनी त्याला जोशिविहीर येथील उड्डाणपुलाखाली पकडले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळून आला.