सातारा प्रतिनिधी | मोहोळ पोलीस ठाणेकडील डीबी पथकाला बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर योग्य ती कारवाई करण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर आणि पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यातील स्टाफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड, माण येथील आरोपींचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १० नोव्हेंबर दिवशी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना पाकणीच्या पुढे कार्निवल हॉटेल जवळ काही अंतरावर दोन पांढऱ्या रंगाच्या कार गाडया संशयितरित्या अंधारामध्ये उभ्या असलेल्या पोलीसांना आढळून आल्या. त्या कारमधील इसम हे संशयितरित्या ये-जा करणाऱ्या वाहनांकडे पाहत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ते काहीतरी करणार असल्याच्या संशय पोलीसांना आला. सदर गाडीजवळ पोलिसांनी जावून पाहिले असता, सदर गाडीच्या बाहेर असलेले इसमांनी पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी पोलीसांनी त्यांना जागीच पकडले आणि ताब्यात घेतले.
निलेश धन्यकुमार घुगे (रा.भेंड ता.माढा जि.सोलापुर), नितीन अंकुश जगदाळे (रा.भवानी माता नगर,उंब्रज ता.कराड जि.सातारा), नितीन भारत पडळकर (रा.म्हसवड ता.माण जि.सातारा), दिनेश धनाजी मुळे (रा. खंडाळी ता.मोहोळ जि.सोलापुर), किल्लो गुरु अर्जुन (रा वाराडा.जि. मुलंगीपुट,आंध्रप्रदेश), भुषण गणपतराव जाधवर (मोडनिंब ता.माढा जि.सोलापुर) ओंकार दत्तात्रय गव्हाणे (रा.कुर्डुवाडी ता.माढा जि.सोलापूर), मारुती चंद्रकांत भोर (रा.कोळविहीर ता.पुरंदर जि.पुणे), पवन भिमराव कोळी (रा.कुर्डुवाडी ता. माढा जि.सोलापूर). अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता ते विचित्र हावभाव करू लागल्याने त्यांचेबाबत अधिक संशय वाढला. पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या गाडीची डीकी चेक केली असता त्या दोन्ही गाडीत तीन धारधार तलवारी, एक धारधार सुरा, पांढऱ्या रंगाची दोरी व लोखंडी टॉमी मिळून आल्याने पोलीसांना त्यांचेकडे अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आडवून एखाद्या वाहनावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबलो. असल्याची सदर इसमांनी कबुली दिली.
पोलिसांनी त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले व त्यांच्यावर मोहेळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारा २ हजार ५०० रू किंमतीचा मुद्देमाल आणि १८ लाख किंमतीच्या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पुढील तपास हा पोलिस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली दयानंद हेंबाडे, संदेश पवार , चंद्रकांत ढवळे, सिध्दनाथ मोरे, अमोल जगताप, संदीप सावंत यांनी बजावली आहे.