सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री असतानाच भरदिवसा एमआयडीसीत दोघांना एका टोळीतील सराईत गुंडांनी लूटमार करत मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाण करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून पाच जणांना अटक केले आहे.
संशयित युवकांची टोळी पवाराची निगडी, ता. सातारा येथील आहे. त्यांच्याकडून चोरीच्या रकमेसह २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
निखील सुनील बोभाटे (वय २१), महिफूज सलीम इनामदार (२३), संकेत विजय खंडझोडे (२२), ओंकार सचिन लोंढे (१८), अविष्कार अण्णा बोभाटे (१९, सर्व रा. निगडी (पवाराची) ता. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दि. १८ ऑगस्ट रोजी सातारा शहरालगत एमआयडीसीमध्ये संशयित टोळीने परप्रांतातून कामानिमित्त आलेले ट्रक चालक तसेच कामगार यांना ठिकठिकाणी अडवून पैशाची मागणी केली. ज्यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.
मारहाण करत दहशत माजवून त्यांच्याकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेत एक चालक टोळीच्या मारहाणीत गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एमआयडीसी परिसरातील या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर तेथील उद्योजक व कामगार भयभीत होवून दहशतीखाली गेले. दरम्यान, एक संशयित एका हॉटेल समोरून जाताना दिसल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर लुटमार केल्याचा गुन्हा साथीदारामार्फत केला असल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे श्याम काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजीत भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी कारवाईत सहभाग घेतला.