जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी फुलली आकरा जातीची कारवीची फुले, 4 वर्षांनी येतो फुलांना बहर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | निसर्गाचा चमत्कार हा जसा पक्षांच्या आवाजात पहायला मिळतो. तसा तो विविध रंगाच्या फुलांमध्ये देखील पहायला मिळतो. आपल्या अवतीभोवती अशी अनेक जीवजंतू आणि फुले असतात की ती आपल्याला माहिती देखील नसतात. मात्र, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे दर चार वर्षांनी फुलणार्‍या कारवी जातीच्या प्रकारातील आकरा या वनस्पतीला फुले येऊ लागली आहे. या फुलांच्या बहराचा हंगाम सद्या सुरू झाला आहे. पांढरट आकराच्या फुलांनी महाबळेश्वरचे पठार फुलले आहे.

तसे पाहिले तर वनस्पती शास्त्रातील या वनस्पतीचे नाव लेपिडोग्याथास कुस्तीडाटा असे आहे. याची फुले पांढर्‍या रंगाची छोटी छोटी असतात. 20-25 टोकदार काट्यांच्या झुपक्यावर ती येतात. मधमाशांच्या परागीभवनासाठी व आतील औषधी मधामुळे या प्रकारच्या फुलोर्‍याला विशेष महत्व आहे.

कारवीचे प्रामुख्याने चार प्रकार आढळतात. दर सात वर्षांनी फुलणारी कारवी ‘व्हाईटी’ तर, ‘आकरा’ या प्रकारात दर चार वर्षांनी फुले येतात. ‘खरवर’ या प्रकारात दर सोळा वर्षांनी फुले येतात. प्रत्येक हंगामात येणार्‍या फुलोर्‍यावेळी मधमाशा त्या त्या फुलांमधून जो मध गोळा करतात तो विशेष उपयुक्त असल्याचे मानले जाते.

सध्या आकरा जातीच्या कारवी फुलांचा हंगाम सुरु झाला आहे. या कारवीची वैशिष्ठे म्हणजे हिची फुले साधारण अर्धा इंच लांब असतात, ती पांढर्‍या रंगाची असून फुलाची एक पाकळी थोडी लांब तर दुसरी तुलनात्मक आखूड असते. फुलांच्या आत परागकण असतात. तेथेच मध साठलेला असतो. या फुलांचा मादक व मोहक वास मधमाशांना आकर्षून घेतो. टोकदार हिरव्या पानांच्या झुपक्यामुळे या वनस्पतीला संरक्षण मिळते. त्यामुळे फुलोर्‍याच्या काळात मधमाशांव्यतिरिक्त कोणीही या वनस्पतीजवळ जात नाही.