कराड तालुक्यातील निराधार अन् दिव्यांगांची दसरा-दिवाळी गोड; वाढीव पेन्शन खात्यावर जमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | तीन महिन्यांपासून रखडलेल्या संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेची पेन्शन वाढीव रकमेसह लाभार्थांच्या खात्यात जमा झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार बाजीराव पाटील यांनी दिली. दरम्यान, पेन्शन जमा झाल्याने कराड निराधार, दिव्यांगांचा दसरा, दिवाळी गोड झाली आहे.

कराड तालुक्यात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे एकूण 10 हजार 779 लाभार्थी आहेत. शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेंतर्गत निराधार, दिव्यांग, विधवा आदी लाभार्थ्यांना प्रती महिना एक हजार रूपये पेन्शन दिली जात होती. ही पेन्शन वाढवून 1500 रूपये करण्यात आली आहे.

मात्र, जुलैपासून निधीअभावी पेन्शन रखडली होती. त्यामुळे तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात लाभार्थी रोज हेलपाटे घालत होते. केवळ शासनाकडून मिळणाऱ्या पेन्शनवर अवलंबून असलेल्या गरजू लाभार्थांकडून वारंवार पेन्शन कधी जमा होणार, अशी विचारणा होत होती.

कराड तालुक्यात संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या 10 हजार 779 लाभार्थ्यांची पेन्शनसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला. त्यानंतर प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या साह्याने एकाच दिवसात निधी लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करून घेतला.

लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा झालेल्या पेन्शनचे वाटप सुरू झाले आहे. दीड हजार रूपये प्रमाणे तीन महिन्यांची पेन्शन लाभार्थ्यांनी काढून घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी केले आहे. दरम्यान, पेन्शन जमा झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.