साताऱ्यात पाण्याबाबत पालिकेकडून जुना निर्णय रद्द, असे आहे नवीन वेळापत्रक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील काही नागरिकांनी पाण्यासाठी मोकळे हंडे घेऊन रास्ता रोको देखील केला होता. यानंतर पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत कास व शहापूर योजनेतील उपलब्ध पाणीसाठ्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. सातारा पालिकेने दोन्ही योजनांच्या पाणीपुरवठ्यात कपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी रविवार, दि. १० मार्च पासून केली जाणार आहे. शहरात दोन महिन्यांपासून सुरू असलेला पाणीकपातीचा निर्णय प्रशासनाने रद्द
केला असून, आता नवीन वेळापत्रकानुसार प्रत्येक पेठेचा पाणी पुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जाणार आहे.

सातारा शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली असल्यामुळे पालिका प्रशासनाकडून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यामध्ये पूर्ती दमछाक होत आहे. परिणामी सातारा शहरातील नागरिकांना कधी कमी दाबाने पाणी मिळत आहे, तर कधी पाणीच मिळत नाही. शहरातील बहुतांश पेठांमध्ये दोन महिन्यांपासून पाण्यासाठी ओरड सुरू आहे. पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याचे लक्षात आल्याने पालिका प्रशासनाकडून शहराच्या पाणीपुरवठ्यात दर मंगळवार व शनिवारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाने पाणी कपातीचा जुना निर्णय रद्द करून प्रत्येक पेठेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक दिवस कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहापूर योजनेच्या कपातीवर दि. १० तर कास योजनेच्या कपातीवर दि. ११ पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. कास धरणात मुबलक पाणीसाठा असताना हा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.