साताऱ्यातील कार-दुचाकी अपघातात अधिकाऱ्याचा मृत्यू, पाल नगरीवर शोककळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील मोनार्क हॉटेल परिसरात कार आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. नागेश सूर्याजीराव यादव (वय 52, रा. संगम कॉलनी, गोडोली, मूळ रा. शिरगाव, ता. कराड) असे त्यांचे नाव आहे. ते वाई येथील सहकार कार्यालयात अधिकारी होते. कारचा वेग अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार नागेश यादव हे दुचाकीवरुन शाहूनगरच्या दिशेने निघाले होते. मोनार्क चौकाच्या कोपऱ्यावर असताना गोडोलीकडून हॉटेल सयाजीच्या दिशेने इलेक्ट्रिकल टियागो कार वेगाने आली. या कारने यादव यांना जोरदार धडक दिली आणि ती तशीच वेगाने पुढे जाऊन पलटी झाली. या कारने तेथे सुरु असलेल्या कन्स्ट्रक्शनच्या भिंतीला देखील धडक दिली. या अपघातात नागेश यादव हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच कारचे देखील मोठे नुकसान झाले. कारचा वेग अनियंत्रित असल्याने हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अपघात करणाऱ्या कार चालकाचे नाव मात्र समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती. अपघाताची माहिती यादव कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. नागेश यादव यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि भाऊ, असा परिवार आहे. या घटनेमुळे पाल नगरीवर शोककळा पसरली आहे.