कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील उष्माघाताचा झळा हळूहळू जाणवू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी कडक उन्ह देखील पडत आहे. दरम्यान, मागील वर्षांप्रमाणे यंदा पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नसल्यामुळे जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासणार आहे. जिल्ह्यात अजूनही काही गावात पाण्याअभावी टँकर सुरु असून माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांसह इतरही तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, वाई या पाच तालुक्यांत सर्वाधिक ८६ गावे २९८ वाड्यावस्त्यावर ८९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात पावसाच्या कमी प्रमाणामुळे पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचीही अडचण भेडसावू लागली आहे. जिल्ह्यात तब्बल १ लाख ४१ हजार १८१ जनता टँकरच्या पाण्यावर अंवलबून आहे. जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या माण तालुक्यात ३७ गावे व २४७ वस्त्यांवर ४६ टँकर सुरू असल्यानेटंचाईची भीषणता दिसून येत आहे. पाण्याची उपलब्धता नसल्याने पिकांचेही नुकसान होणार आहे. माण पाठोपाठ कोरेगाव तालुक्यात १९ टँकरद्वारे २२ गावात पुरवठा केला जात आहे.
खटाव तालुक्यात १२ टँकरद्वारे १३ गावे नऊ वाड्यावस्त्यावरपुरवठा केला जात आहे. तसेच फलटण तालुक्यात ११ टँकरद्वारे १३ व ४३ वाड्यावस्त्यावर पुरवठा केला जात आहे. वाईला एका टँकरद्वारे एका गावातपुरवठा केला जात आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पातळी कमी झाली आहे.
95 हजार पशुधनांची भागतेय तहान टँकरद्वारे
सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने भूजल पातळीत घट होत चालली आहे. अशात जनावरांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या ९५ हजार ३० पशुधनाची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे. याबाबत राज्य सरकारने लवकर मार्ग काढावा, अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.