सातारा प्रतिनिधी । स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात यासाठी जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा अभियान’ राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 1 हजार 761 गावातील 6 लाख 9 हजार 472 घरांवर तिरंगा ध्वज फडकणार आहे. हा उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्टअखेर राबवला जाणार आहे.
स्वतंत्र संग्रामातील नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे. तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या देदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. त्यानुसार दि. 13 ऑगस्ट अखेर जिल्हा व स्थानिक स्तरावर सायकल, बाईक, मोटार कार यावर तिरंगा ध्वज लावून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात यावे.
यामध्ये राज्य, राष्ट्रीय, ऑलिम्पिक खेळातील खेळाडूंना या उपक्रमात सहभागी करुन घेतले जाणार आहे. दि. 15 ऑगस्ट रोजी तिरंगा रन, मॅरेथान जिल्हा व स्थानिक स्तरावर आयोजित केली जाणार आहे. जिल्हा व स्थानिक स्तरावर होणार्या सर्व कार्यक्रमामध्ये तिरंगा शपथ उपक्रम राबवण्यात यावा. तिरंगा ट्रीब्युट कार्यक्रमांमध्ये शहीद वीर, स्वातंत्र्यसैनिक यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे व शहीद वीर, स्वातंत्र्यसैनिक यांना श्रध्दांजली अर्पण करणे. दि. 15 पर्यंत तिरंगा मेला आयोजित करुन तिरंगा झेंडे, टी शर्ट, गारमेंट, तिरंगा बॅजेस, हँडीक्राफ्ट, वस्तू, खाद्य पदार्थ इत्यादी स्टॉल्स लावून स्थानिक कारागीर, कलाकार, महिला बचतगट यांना व्यवसाय उपलब्ध करुन देणे.
दि. 13 ते 15 ऑगस्ट या तिन्ही दिवशी सामूहिक बांधिलकीचे मूर्त स्वरूप असलेल्या व देशभक्तीची भावना जागृत राहण्यासाठी हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा उपक्रम राबवण्यात यावा, असे आवाहन ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील 1 हजार 492 ग्रामपंचायत, 1 हजार 761 गावे व 6 लाख 9 हजार 472 घरांवर तिरंगा ध्वज फडकणार आहे.