उंच होर्डिंग्ज, प्लेक्स लावलेत आता 3 दिवसात रिपोर्ट दाखल करा; कराड पालिकेची 42 जणांना नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिकांनी खबरदारी घेत शहरातील होर्डिंग्ज, फ्लेक्स, कटआऊट, बोर्ड याविरोधात मोहीम हाती घेतली आहे. साताऱ्यानंतर आता कराड पालिकेने देखील कराडमधील अनाधिकृत फ्लेक्सप्रकरणी कराड होर्डिंग्ज, फ्लेक्स लावणाऱ्या ४२ जणांना सोमवारी नोटीस बजावली आहे. संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट तसेच नगरपालिकेची परवानगी सादर करण्याच्या सूचना केल्या असून दि. ३१ मे पर्यत या होर्डिंग्जबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

आपल्या जाहिराती व उत्पादनाबाबत माहिती देण्यासाठी विविध कंपन्या, संस्थांकडून शहरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावली जातात. मात्र, त्याची देखभाल केली जात नसल्याने होर्डिंग्ज, फ्लेक्स, कटआऊट धोकादायक बनतात. सध्या वादळी पावसामुळे होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात आशिया प्रकारची उंचच्या उंच होर्डिंग्ज कोसळण्याच्या दुर्घटना देखील घडतात. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वानंद शिरगुप्पे यांनी शहरातील होर्डिंग्ज, विविध कंपन्या, संस्था, व्यावसायिकांना नोटीस काढली असून तीन दिवसांत संबंधित होर्डिंग्ज तसेच इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट व शहर नियोजन विभागाची परवानगी सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कराड पालिकेचा सध्या या होर्डिंग्ज, फ्लेक्सबाबत सर्व्हे सुरू केला आहे.

कराड शहरात 40 ते 50 होर्डिग्ज, फ्लेक्स

कराड शहरात सध्या शहरात ४० ते ५० होर्डिग्ज, फ्लेक्स आहेत. त्यातील सध्या ४२ जणांना नोटिसा काढल्या आहेत. सर्व्हे सुरू असल्यामुळे अजूनही हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ३१ मे पर्यत अनाधिकृत फ्लेक्स न हटवल्यास पालिकेकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून, होर्डिंजचे साहित्य जप्त करण्यात येणार आहेत. होर्डिंज काढण्याचा खर्च दंडासह वसूल करण्यात येणार असल्याची नोटीस बजावण्यात आली आहे.