सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात रात्रीच्या उकाड्याबरोबर दिवसा उन्हाची तीव्रता वाढू लागली असून सातारा शहराचा पारा यंदा प्रथमच ४० अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचला. मंगळवारी ३९.२ अंशाची नोंद झाली तर पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यातील कमाल तापमानाने ४० अंशाचा टप्पाही पार केला आहे.
मंगळवारीही दुपारी कडक ऊन पडलेले. यामुळे दिवसभर उन्हाच्या झळा सोसण्याची वेळ लोकांवर आलेली. त्याचबरोबर उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्रामीण भागातील रस्तेही ओस पडू लागलेत. शहरातील रस्त्यावरही दुपारच्या सुमारास गर्दी कमी जाणवत आहे. त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढलेली आहे. सातारा जिल्ह्यात यावर्षी हिवाळ्यात थंडी अधिक प्रमाणात जाणवलीच नाही. पण, उन्हाळ्याला लवकर सुरूवात झाली आहे. कारण फेब्रुवारीतच जिल्ह्यातील कमाल तापमान ३५ अंशावर गेले होते.
तर मार्च महिना सुरू झाल्यानंतर उन्हाची तीव्रता आणखी वाढली. त्यामुळे मागील आठवड्यात दोनवेळा सातारा शहराचा पारा ३८ अंशावर गेलेला. तसेच थंड हवेच्या महाबळेश्वरचाही पारा वाढला. तर जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे माण, खटाव, फलटण हे तालुके. या दुष्काळी तालुक्यातही उन्हाचा कडाका आहे. मागील काही दिवसांत तर दुपारच्या सुमारास उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. अशातच मंगळवारी जिल्ह्यातच यावर्षीच्या आतापर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली.
सातारा शहराचा पारा मार्च महिन्यात आतापर्यंत ३८.५ अंशापर्यंत पोहोचला होता. पण, मंगळवारी कमाल तापमानाने ३९ अंशाचा टप्पार पार केला. साताऱ्यात ३९.२ अंशाची नोंद झाली. त्यामुळे लवकरच साताऱ्याचा पारा ४० अंशाचाही टप्पा पार करण्याचा अंदाज आहे. तर पूर्व भागातील कमाल तापमान ४० अंशावर पोहोचले आहे.