सातारा प्रतिनिधी । राज्यात येत्या आठवड्यात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून आज सर्वात कमी 15 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमान 29 अंशांवर आहे. त्यामुळे दुपारी उकाडा देखील जाणवत होता. दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरी पर्यंत थंडीचा कडाका पुन्हा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. थंडीची चाहूलही लागत आहे. त्यातच सातारा जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला असून महाबळेश्वरमध्ये 15.4 अंश सेल्सिअस तर साताऱ्यात 15 ते 16.1 अंश सेल्सिअस इतके तापमान खाली येत आहे. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
सातारा जिल्ह्यात तशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यापैकी सत्वाअधिकी पसंती दिली जाते ती महाबळेश्वरला. कारण येथील बाजारपेठ, वेण्णा लेक बोटिंग याचा आनंद काही औरच असतो. दोन दिवसांपासून हवेत गारठा वाढत चालला असून साताऱ्याचा पारा १६.१ अंशापर्यंत तर महाबळेश्वरचा पारा १५.४ अंशाखाली येत आहे. त्यामुळे हुडहुडी वाढली असून शेकोट्या देखील पेटू लागल्या आहेत.