सातारा 12 तर महाबळेश्वर 11 अंशांवर; शहारासह ग्रामीण भाग गारठला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याचा गेल्या आठवडाभरापासून पारा खाली घरत आहे. दरम्यान बुधवारी आणि आज गुरुवारी देखील सातारा शहरात १२, तर महाबळेश्वरला ११ ते १२ अंशापर्यंत पारा खाली आला होता. जिल्ह्यात थंडीची लाट वाढू लागली असून शहरी आणि ग्रामीण भाग गारठला असल्याने शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी थंडीला सुरुवात झाली. सुरुवातीला किमान तापमान २० अंशादरम्यान होते. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत होती. दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता होती. पण, मागील १० दिवसांपासून किमान तापमानात सतत उतार येत चालला आहे. सहा दिवसांपासून जिल्ह्याचा पारा कायम १५ अंशाच्या खालीच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागतोय. यामुळे जनजीवनावर चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे.

सातारा शहरात मंगळवारी १२.९ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. पण, एकाच दिवसात पारा जवळपास एक अंशाने घसरला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास शहराचे किमान तापमान १२ अंश नोंद झाले. यामुळे सकाळच्या सुमारास थंडीची लाट जाणवली. तसेच शीतलहरही असल्याने नागरिकांना हुडहुडी भरून येत होती. परिणामी सकाळी फिरण्यास जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. महाबळेश्वरचा पारा घसरला आहे. यामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाल्याचे जाणवते. सायंकाळी थंडीच्या वेळी पर्यटकांची संख्या तुरळक प्रमाणात दिसून येत आहे.

जिल्ह्याचा पारा घसरल्याने ग्रामीण भागातही थंडीची लाट आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरीवर्ग दुपारच्या सुमारास शेतीची कामे उरकत आहे. तसेच शहरातील बाजारपेठेतही सायंकाळच्या सुमारास गर्दी जाणवत नाही. थंडीची तीव्रता पाहता आणखी काही दिवस गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.