कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात रेल्वेच्या दुहेरीकरणाची कामे वेगाने केली जात आहेत. अशात अधून मधून मेगाब्लॉक देखील लावला जात आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागातील पुणे-मिरज मार्गावर असलेल्या तारगाव-मसूर-शिरवडे दरम्यान रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, विविध अभियांत्रिकी, सिग्नलिंग दूरसंचार कामांसाठी गुरुवार दि. २२ रोजी पर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द झाल्या आहेत तर काही काही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
सातारा जिल्ह्यातल्या तारगाव-मसूर-शिरवडे दरम्यानच्या या रेल्वे ब्लॉकमुळे दि. २० आणि दि. २१ फेब्रुवारी रोजीची गाडी क्रमांक ०१०२४ कोल्हापूर- पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे, तसेच गाडी क्रमांक ०१०२३ पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. २२ फेब्रुवारीला सुटणारी गाडी क्रमांक ११०३० कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस व गाडी क्रमांक ११०२९ मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या रद्द केल्या आहेत.
ता. २३ रोजी गाडी क्रमांक ०१०२३ पुणे- कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/शॉर्ट ओरिजिनेशन होणार आहे. ते पुढीलप्रमाणे : २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी सुटणारी डेमू क्रमांक ०१५४२ कोल्हापूर – सातारा या गाडीचा प्रवास कराड येथे संपेल. तर डेमू क्रमांक ०१५४१ सातारा-कोल्हापूरचा प्रवास कऱ्हाड येथून कोल्हापूरकडे सुरू होईल. दि. २१ आणि २२ फेब्रुवारीला सुटणारी गाडी क्रमांक ११४२५ पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसचा प्रवास सातारा येथे संपेल आणि गाडी क्रमांक ११४२६ कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस सातारा येथून पुण्यासाठी सोडण्यात येईल म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-सातारा दरम्यान रद्द राहील.दि. २१ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून सुटणारी गाडी क्रमांक ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा प्रवास पुण्यात संपेल.
दि. २२ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथून सुटणारी गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुणे येथूनच सुटेल. म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-पुणेदरम्यान रद्द राहील. हे मेगा ब्लॉक दुहेरीकरण, पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली असून, सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
‘या’ मार्गात गाड्यांचे करण्यात आले आहेत बदल
मध्य रेल्वेच्या वतीने मेगा ब्लॉक मुळे काही गाडयांच्या मार्गात बदल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये दि. २१ फेब्रुवारी रोजी हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी गाडी क्रमांक १२६३० हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर एक्स्प्रेस दौंड- कुर्डूवाडी- पंढरपूर- मिरज या वळवलेल्या मार्गाने धावेल. ही गाडी पुण्याला येणार नाही. ता. २१ फेब्रुवारी रोजी बंगळूरहून सुटणारी गाडी क्रमांक १६५०५ बंगळूर-जोधपूर एक्स्प्रेस मिरज- पंढरपूर- कुर्डूवाडी- दौंड-पुणे या वळवलेल्या मार्गावर धावेल. ही गाडी सांगली, कऱ्हाड, सातारा येथे येणार नाही, तसेच १७ व १८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून सुटणारी गाडी क्रमांक ११०३० कोल्हापूर -मुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर येथून नियमित सुटण्याची वेळ ०८.१५ ऐवजी १०.१५ वाजता अर्थात दोन तास उशिराने सुटणार आहे.