सातारा प्रतिनिधी | जालना येथे मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वाई येथून साताऱ्याकडे पायी निघालेला मराठा समाजाच्या बांधवांचा मोर्चा पाचवड,ता. वाई येथील महामार्गावर पोलिसांनी अडवला. यावेळी आंदोलक व पोलिसांच्यात शाब्दिक वादावादी झाली. मात्र, काही वेळेनंतर तणाव मावळला.
जालना येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज वाई ते सातारा, असा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने युवक मोर्चात सहभागी होत सातारच्या दिशेने निघाले. मराठा समाज बांधव मोर्चातून जेव्हा पाचवड येथे महामार्गावर दाखल झाले तेव्हा पोलिसांनी त्यांचा मोर्चा रोखून धरला आहे. यामुळे मोर्चातील युवक चांगलेच आक्रमक झाले.
यावेळी तणावपूर्व वातावरण निर्माण झाल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मराठा मोर्चातील समन्वयकांशी चर्चा केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनीच निवेदन स्वीकारावे, यासाठी मराठा बांधव आक्रमक झाले. अखेर दोन्ही अधिकाऱ्यांनी समाजबांधवांच्या समजूत काढली व त्या ठिकाणी समाजबांधवांच्या निवेदन स्वीकारले.
मोर्चेकरांनी उड्डाण पुलाखाली घेतली सभा…
पाचवड येथे वाई ते सातारा पायी मोर्चा अडवल्यानंतर उड्डाणपुलाखालीच मोर्चेकर्यांनी सभा घेतली. जो पर्यंत या सरकारकडून मराठा समाजबांधवांना आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत अशा प्रकारे वेळोवेळी मोर्चे काढून, आंदोलने करून मागणी करणार असल्याचं इशारा समाजबांधवांनी यावेळी दिला.