सातारा प्रतिनिधी | सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्या कास तलावाच्या जलवाहिनीला कासाणी गावाजवळ गळती लागली आहे. पाणीपुरवठा खंडित न करता, ही गळती काढण्याचा निर्णय सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. गळती काढण्याचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे.
सातारा शहराला प्रामुख्याने कास, शहापूर योजना आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. कास तलावाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम पालिकेने नुकतेच पूर्ण केले आहे. तलावात होणार्या वाढीव पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी नवीन जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यास दोन वर्षे लागणार असून, तोपर्यंत जुन्याच जलवाहिनीतून शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
नवीन जलवाहिनीचे काम गतीने करण्यात येत आहे. जुन्या जलवाहिनीला कासाणी गावाजवळ अचानक गळती लागली. याची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाहणी करून, उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पाणीपुरवठा खंडित न करता ही गळती काढण्यात येणार आहे. त्यामुळे या कामावर काही अंशी परिणाम होत आहे.
ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा खंडित केल्यास, पालिका प्रशासनास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने आहे त्या परिस्थितीत कामास सुरुवात केली आहे. या कामास दोन-तीन दिवस लागणार असून, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे अभियंतातर्फे करण्यात आले आहे.