कराड प्रतिनिधी | बांगला मुक्ती लढ्यातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ १९९८ पासून (कोरोनाचा काळ वगळता) कराडमध्ये विजय दिवस साजरा होत आहे. मात्र, यंदा विजय दिवसाचा मुख्य सोहळा रद्द करण्यात आला असल्याची माहिती हाती आली असून विजय दिवस समारोहाच्या अनुषंगाने सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्य सोहळा रद्द होण्यामागे नागरिकांच्या सुरक्षिततेचे कारण समोर आले आहे.
कराडमध्ये दिनांक 12 ते 16 डिसेंबर यादरम्यान विजय दिवस समारोह साजरा केला जात होता. मध्यंतरीच्या कोरोना काळात विजय दिवस साजरा करता आला नव्हता. त्यानंतर पुन्हा विजय दिवसाचा सोहळा पहिल्याप्रमाणे दिमाखात साजरा करण्यात आला. यंदा मात्र, छत्रपती शिवाजी स्टेडियममधील प्रेक्षक गॅलरीच्या कारणावरून संयोजकांना मुख्य सोहळा रद्द करावा लागला आहे.
छत्रपती शिवाजी स्टेडियमची प्रेक्षक गॅलरी कमकुवत असल्याने मुख्य सोहळ्यावेळी नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असा तांत्रिक धोका बांधकाम विभागाने संयोजकांच्या निदर्शनास आणून दिला आहे. तसेच यंदाचा मुख्य सोहळा रद्द करावा असे देखील सुचविले आहे. त्यानुसार विजय दिवसाचा मुख्य सोहळा रद्द करून दरवर्षी होणारे अन्य कार्यक्रम घेण्याचे संयोजकांच्या विचाराधीन आहे.
सोहळा रद्द करण्यामागील ‘हे’ आहे कारण…
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची प्रेक्षक गॅलरी धोकादायक बनली असल्याचे बांधकाम विभागाने सुचित केल्यामुळे संयोजकांनी विजय दिवसाचा मुख्य सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यंदाचा सोहळा होणार नसल्याची चर्चा देखील केली जार आहे.