कराड प्रतिनिधी । ससून रुग्णालयातून 14 डिसेंबर रोजी वैद्यकीय अधिक्षकांच्या कार्यालयातून दोन शिक्के चोरीला गेले होते. येथील रुग्णालयातून वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांचे शिक्के चोरुन बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दोघं आरोपींमधील एका आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश पांडुरंग मोंडकर (रा.कणकवली, सिंधुदूर्ग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार मुख्य आरोपी सत्पाल पवार (रा. कराड, सातारा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. शैलेश शिवशंकर दामशेट्टी (वय 26, रा.रास्ता पेठ) यांनी याबाबत बंडगर्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ससून रुग्णालयातून 14 डिसेंबर रोजी वैद्यकीय अधिक्षकांच्या कार्यालयातून दोन शिक्के चोरीला गेले होते. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासण्यात आले. तेव्हा चित्रीकरणात मोंडकर आढळून आला. प्रमापणत्रावर वैद्यकीय तज्ज्ञांची स्वाक्षरी केली जाते. त्यामुळे आरोपी स्वाक्षरी घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात येईल, याची खात्री वैद्यकीय तज्ज्ञांना होती. मोंडकरने बनावट प्रमाणपत्र (फिटनेस सर्टीफिकेट) तयार केले.
बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी तो वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात आला. वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले. सत्पाल पवार मुख्य आरोपी असून त्याने मोंडकर आला मुंबईतील बेस्टमध्ये कामाला लावतो असे सांगून 1 लाख रुपये उकळले होते. त्यानंतर त्यांनी ससूनमधून वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी शिक्के चोरुन नेले. या शिक्क्यांचा आणखी कोठे वापर करण्यात आला आहे का ? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करत आहेत.