साताऱ्यात प्रेमी युगुलाने बंधाऱ्यात मारली उडी, शोधकार्य सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | प्रेमी युगुलाने बंधाऱ्यात उडी मारल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील कोंडवे गावच्या हद्दीत रविवारी सायंकाळी घडली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचा थांगपत्ता लागलेला नव्हता. अक्षय ज्योतीराम पवार (वय २६, रा.दिव्‍यनगरी, सातारा) आणि गौरी चव्‍हाण (वय २३, रा. सातारा) अशी बंधाऱ्यात उडी मारलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोंडवे (ता. सातारा) गावच्या हद्दीतील बंधार्‍यात प्रेमवीरांनी उड्या घेतल्‍याच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बंधाऱ्यात शोधकार्य सुरू करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत दोघांचा शोध सुरु होता.

साताऱ्यातील दिव्‍यनगरी रस्‍त्‍यावरील कोंडवे गावच्या हद्दीत एक प्रेमी युगुल दुचाकीवरुन आले होते. आणखी एकजण त्यांच्या सोबत होता. तरूणीशी तरूणाने चर्चा केली. चर्चा झाल्‍यानंतर अचानक तिने बंधार्‍यात उडी मारली. पाठोपाठ तरूणानेही उडी मारली. पाहता पाहता दोघेही बंधार्‍यात बुडाले. या घटनेने भेदरेल्‍या काही जणांनी तात्‍काळ सातारा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलीस तात्‍काळ घटनास्‍थळी दाखल झाले. प्रेमी युगुलाने बंधाऱ्यात उडी मारून केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे सातारा आणि दिव्यनगरी परिसरात मोठी खळबळ उडाली. दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.

तीन तासानंतर युवतीचा मृतदेह सापडला…

युवक व युवतीने उडी घेतल्याची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी काही वेळेनंतर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता बंधाऱ्यातील गाळात युवतीचा मृतदेह रुतल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी मदतकार्य करणाऱ्या पथकांना बोलावले. सततचा पाऊस आणि अंधार पडल्याने मृतदेह बाहेर काढण्यास अडथळा निर्माण होत होता. यानंतर सुमारे दोन ते तीन तास प्रयत्न करीत रात्री मृतदेह बाहेर काढले. काही वेळातच अक्षयचाही मृतदेह सापडला. दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या दोघांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. सातारा तालुका पोलिस दोघांच्या घरातल्यांकडे चाैकशी करत आहेत.