आईला न सांभाळणाऱ्या मुलांसह सुनांच्या हातात पडल्या बेड्या; पोटगी वॉरंटमध्ये होते फरारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मुले आणि सुना सांभाळत नसल्याच्या कारणावरुन पिंपरे बुद्रुक येथील वृद्धेने कौटुंबिक हिंसाचाराची मुंबईतील विक्रोळी न्यायालयात केस दाखल केली होती. या खटल्यात आईचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांसह त्यांच्या सुनांवर अटक वॉरंट बजावण्यात आले होते. वाॅरंट नंतर फरार झालेल्या चाैघांना लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच अटक केल्यानंतर त्यांना मुंबईतील विक्रोळी न्यायालयातही हजर करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंपरे बुद्रुक येथील ताराबाई ज्ञानदेव शिंदे (वय ७५) यांना प्रताप शिंदे आणि विजय शिंदे ही दोन मुले तसेच दोन सुनाही आहेत. हे सर्वजण सांभाळ करत नसल्याने त्या मुंबईत मुलीकडे आश्रयाला आहेत. याबाबत त्यांनी विक्रोळी न्यायालयात काैटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत केस दाखल केली होती. यामध्ये न्यायालयाने ताराबाई शिंदे यांच्या मुला आणि सुनांविरोधात जप्ती, अटक वाॅरंट काढले होते.

हे वाॅरंट निघाल्यानंतर संबंधित फरार झाले. तसेच ते कोठेही मिळून येत नव्हते. दि. ८ नोव्हेंबर रोजी प्रताप आणि विजय शिंदे हे दोघेजण घरी आल्याबाबतची माहिती लोणंद पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे हवालदार धनाजी भिसे यांच्यासह स्टाफने दोघांना ताब्यात घेतले. तर त्यानंतर दोघांच्याही पत्नीला अटक करण्यात आले. या सर्वांना विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तर सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, सहायक फाैजदार रमेश वळवी, हवालदार धनाजी भिसे, हवालदार योगेश कुंभार, नितीन भोसले, विठ्ठल काळे, अश्विनी
माने, संजय चव्हाण आदींनी दीं कारवाईत सहभाग घेतला.

घरी आल्याचे समजताच कारवाई…

मुलांनी आणि सुनांनी काैटुंबीक हिंसाचार केल्याने ताराबाई शिंदे यांनी विक्रोळी न्यायालयात केस दाखल केली होती. त्यामुळे न्यायालयाने चाैघांच्या विरोधात जप्ती आणि अटक वाॅरंट काढलेले. तेव्हापासून चाैघेजण फरार झाले होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र, त्यांचा तपास लागत नव्हता. पण, संबंधित पिंपरे येथील राहत्या
घरी आल्याचे समजताच पोलिसांनी अटकेची कारवाई केली.