साताऱ्यातील धोम धरणाचा डावा कालवा फुटला, ऊसतोड मजुरांच्या झोपड्या, जनावरे गेली वाहून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील धोम धरणाचा भराव वाहून गेल्याने वाई तालुक्यातील ओझर्डे गावानजीक शनिवारी पहाटे धरणाचा डावा कालवा फुटला. यामुळे चंद्रभागा ओढ्याला पूर आला आहे. ऊसतोड मजुरांच्या ओढ्याकाठी उभारलेल्या झोपड्या आणि जनावरे पुरातून वाहून गेली आहेत. १२ बैलांना वाचविण्यात आले असून दोन बैलांचा शोध सुरू आहे. सध्या प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून कालवा बंद करण्यात यश आले आहे.

वाई तालुक्यातील ओझर्डे परिसरात धोम धरणाचा डावा कालव्याचा भराव वाहून गेल्याने शनिवारी पहाटे कालवा फुटला. यामुळे लाखो लिटर पाणी ओझर्डे येथील चंद्रभागा ओढ्यातून वाहत आहे. सध्या या ओढ्याला मोठा पूर आला आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर असताना घडलेल्या या घटनेमुळे शेती पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या कालवा बंद करण्यात आला आहे. वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कालवा फुटल्याने ओढ्याला पूर

कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. त्यामुळे ओढ्याला मोठा पूर आला. यामध्ये ऊसतोड मजुरांच्या ओढ्याकाठच्या झोपड्या आणि जनावरे ओढ्याच्या पुरातून वाहून गेली. १२ बैलांना वाचवण्यात यश आले असून दोन बैलांचा शोध सुरू आहे.

प्रशासनाकडून मदत कार्य सुरू

कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेत ऊसतोड मजुरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा संपूर्ण संसारच पुरातून वाहून गेला आहे. त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत ऊसतोड मजुरांसाठी मदत कार्य सुरू होते.

दुष्काळी भागासाठी सोडले होते पाणी

दुष्काळी भागासाठी धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत असताना शनिवारी पहाटे कालव्याला भगदाड पडले. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले. यामध्ये ऊसतोड मुजरांच्या झोपड्या वाहून गेल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.