परतीच्या प्रवासातील माऊलीच्या पालखीचा शेवटचा मुक्काम आज पाडेगावमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातील सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे गुरुवार, दि. २५ रोजी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाडेगाव माउलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

गुरूवार दि. २५ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी पाडेगाव येथील माउली सभागृहात विसावत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून साफसफाई, रस्त्यांची स्वच्छता ,पाणी शुद्धीकरण ,तसेच सार्वजनिक शौचालय स्वच्छता , लाईटची सुविधा, मोबाईल शौचालय, वारकऱ्यांसाठी पाडेगाव उपकेंद्रामार्फत आरोग्य सुविधा अशा प्रकारच्या सर्व सुविधांची तयारी करण्यात आलेली आहे.

आजच्या मुक्कामानंतर उद्या (शुक्रवार, दि.२६) सकाळी आठच्या दरम्यान पालखी सोहळा वाल्हे येथील पुढील मुक्कामासाठी निघेल, यादरम्यान नीरा नदीवरील पाडेगाव हद्दीतील प्रसिद्ध दत्तघाट येथे माउलींच्या पादुकांना स्नान झाल्यानंतर सकाळी दहा वाजेपर्यंत सोहळा पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल.

या सोहळ्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व खबरदारी घेऊन वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे.