कराड प्रतिनिधी | इंडियन स्वच्छता लीग 2.0 आणि स्वच्छतेचा पंधरावडा च्या ‘युथ वर्सेस गार्बेज’या थीम अंतर्गत कराड येथील कृष्णा नदीकाठी आज पालिका अधिकारी आणि कर्मचारी याच्या वतीने आज स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले. यामध्ये शहरातील सामाजिक संस्था, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. यावेळी करण्यात आलेल्या स्वच्छतेतून कृष्णा नदीपात्र परिसरातील गवत, झुडपे, कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.
कराड नगरपालिकेच्या वतीने प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता महाअभियानात जलनिस्सारण अभियंता अशोक पवार, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार,जल निस्सारण अभियंता ए. आर. पवार यांच्यासह कराड पालिकेचे सर्व अधिकारी, हेड मुकादम, मुकादम, कर्मचारी आणि कराड नगरपरिषद जनजागृती टीम या स्वच्छता महाभियानात सहभागी होते.
यावेळी आरोग्य अभियंता आर. डी. भालदार यांनी स्वच्छतेची शपथ देऊन या अभियानास सुरुवात केली. इंडियन स्वच्छता लीग २.० ही स्पर्धा स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांसाठी तरुणांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंडियन स्वच्छता लीग या अभियानात देशातील ३०८५ शहरांचा सहभाग असून महाराष्ट्रातील एकूण ४११ शहरांचा यात समावेश आहे. कराड शहराची स्वच्छता ही उत्तम असली पाहिजे आणि ती कायम टिकून राहण्यासाठी प्रयत्न कराड नगरपालिका करत असते.
अभियानात ‘यांनी’ घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग
या महाअभियानासाठी कराड शहराने “कराड सुपर जायंट्स” या नावाने स्पर्धेत सहभाग घेतला. स्वच्छता महाअभियानामध्ये टीम कराड सुपर जायंट्सच्या ब्रँड अँबेसिडर मधुरा किरपेकर, कराड शहरातील संत तुकाराम हायस्कूल, यशवंत हायस्कूल, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, दौलतराव अहिरे कॉलेज, कन्याप्रशाला या शाळा व महाविद्यालयचे विद्यार्थी, एनव्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, कराड अर्बन बँक, कॅनरा बँक, विजय दिवस समारोह समिती, शिवाजी उद्यान ग्रुप, पाटीदार ग्रुप, क्रेडाई ग्रुप,इंजिनिअर्स व आर्किटेक्ट असोसिएशन या संस्था आणि नागरिकांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन सहकार्य केले.