सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मध्यंतरी कोयता गँगकडून एकावर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शहरात कोयता गॅंगची पुन्हा दहशत सुरू झाली असून, मोळाचा ओढा परिसरातील एका हाॅटेलमध्ये चारजणांनी कोयता उगारून दहशत निर्माण केली. तसेच हाॅटेलबाहेर उभ्या असलेल्या एका दुचाकीचीही कोयत्याने तोडफोड केल्याची घटना काल बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील मोळाचा ओढा येथे एक हाॅटेल आहे. रात्री अकरा वाजल्यानंतर हाॅटेल चालकाने हाॅटेल बंद केले. त्यावेळी चार तरुण जेवणासाठी हाॅटेलमध्ये आले. वेळ झाल्याने हाॅटेल बंद केल्याचे सांगताच त्या तरुणांनी कोयता उगारून हाॅटेल चालकाच्या अंगावर धावले.
अचानक तरुणांनी कोयते बाहेर काढल्यामुळे प्रसंगावधान राखून हाॅटेल चालकाने त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या टोळक्याने एवढ्यावरच न थांबता हाॅटेलच्या बाहेर असलेल्या एका दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. दरम्यान, हा प्रकार हाॅटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाला असून, या घटनेचा तपास सातारा शहर पोलिसांकडून केला जात आहे.