सह्याद्री घाट माथ्यावर कारवी फुलोऱ्यात सात वर्षानंतर आला बहर; निसर्गाचा अनोखा अविष्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । दुर्मिळ वनस्पती अन वनौषधीचा खजिना सध्या पश्चिम घाट क्षेत्रात सह्याद्री डोंगर घाट माथ्यावर कारवी वनस्पतीचा बहर आला आहे. या वनस्पतीचे वैशिष्टय म्हणजे तिला आयुष्यात एकदाच आणि तेही सात वर्षानंतर फुल येतं. निसर्गाचा हा अविष्कार पाहण्याची संधी या निमित्ताने निसर्गप्रेमी व पर्यटकांना यवतेश्वर घाटासह कास पठार परिसरात झाली आहे.

स्ट्रोबिलॅन्थेस कॅलोसा कारवी ही वनस्पती प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांगात आढळते. अकेंथेसी कुळातील मोनोकार्षिक प्रकारातील म्हणजे आयुष्यात एकदाच फुलणारी ही वनस्पती आहे. प्रत्येकवर्षी पावसाच्या आगमनानंतर ही वनस्पती हिरवीगार होते. कारवी ही झुडुपवर्गीय वनस्पती आहे. सहा ते दहा फूट वाढणाऱ्या य वनस्पतीचा बुंधा सरळ वाढतो. या वनस्पतींचे आयुष्य अवघं सात वर्षे इतके असते. सातव्या वर्षी सर्व कारवी वनस्पतींना फुले येऊन बिया तयार होतात.

आठव्या वर्षी पावसाळ्यापर्यंत या सर्व वनस्पती मरून जातात. आणि पावसाळ्यात नवीन बियांपासून नवीन रोपटे तयार होतात. उन्हाळ्यात या वनस्पतींच्या फांद्या सुकून मरून जातात. मात्र मुळे जमिनीत जिवंत राहतात. पावसाळ्यात त्यांना नवीन कोंब येतात. असे सतत सात वर्ष सुरू राहते. आणि नवीन रोपटं झाल्यापासून सातव्या वर्षी या सर्व कारवींना फुले येतात फुले फिकट गुलाबी, जांभळ्या रंगाची असतात. गत वेळेला कारवी फुलांचा बहर २०१६ मध्ये आला होता. या अगोदर वर्ष २००० व २००८ मध्ये कारवी फुलल्या होत्या.