कराड प्रतिनिधी । तडीपार असतानाही तो गावात आला आणि बिनधास्तपणे फिरू लागला होता. मात्र, त्याची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केल्याची घटना कराड तालुक्यातील जखिणवाडी गावच्या हद्दीत बिरोबा मंदिरानजीक गुरुवारी रात्री उशिरा घडली.
अविनाश अशोक येडगे (वय २५, रा. जखिणवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तडीपार गुंडांची माहिती काढून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर अधीक्षक आंचल दलाल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. एन. पाटील यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तडीपार गुंडांच्या हालचालीबाबत माहिती घेण्याची सूचना केली होती.
सहाय्यक निरीक्षक गणेश कड, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, अनिल स्वामी, अमोल देशमुख, मुकेश मोरे, संग्राम पाटील, धीरज कोरडे यांच्यासह पथक तडीपार गुंडांची माहिती संकलित करीत होते. त्यावेळी तडीपार आरोपी अविनाश येडगे हा त्याच्या गावी जखिणवाडी येथे आला असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा पथकाने बिरोबा मंदिरानजीक अविनाश येडगे याला ताब्यात घेऊन अटक केले. त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार शशिकांत काळे तपास करीत आहेत.