सातारा प्रतिनिधी । स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून दि. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिनादिवशी संपूर्ण सातारा जिल्ह्यात बेमुदत दुध आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करून चौदा मागण्या मांडून आवाज उठवला.
यावेळी आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये विशेष उल्लेख केला. गाईच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये प्रति लिटर मिळावा, पशुखाद्याचे दर कमी करावेत किंवा रासायनिक खत युरिया ला ज्या पद्धतीने शासकीय अनुदान देण्यात येते त्या धरतीवर पशु खाद्यालाही अनुदान देण्यात यावे. जेणेकरून दूध उत्पादक शेतकऱ्यांना या व्यवसायाची शाश्वती मिळेल. यासाठी शासनाने ठोस दूध धोरण तयार करणे. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा दुधाचा स्वतःचा एक ब्रँड विकसित करावा, दुधाला उसाप्रमाणे एफआरपी कायदा लागू करावा, दुधामधील खाजगी व सहकारी लुटमार थांबवावी.
सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी दूध संघाने कोल्हापूर – सांगली जिल्ह्याप्रमाणे दुधाला दर द्यावे. टेस्टिंग तपासणी भरारी पथक करावे, विमा योजना पुन्हा सुरू करावा, यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊन सुद्धा शासनाने कोणतेही निर्णय घेतले नाही. यावर तत्काळ निर्णय घ्यावा अशा प्रकारची कारवाई करावी आणि शिफारस करण्याची मागणी केली आहे.
आमदार शशिकांत शिंदे व सुरेशअण्णा धस यांचे आभार : प्रमोदसिह जगदाळे
येत्या २३ डिसेंबर पासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलन पुकारलेले आहे. आमच्या चौदा मागण्या शासन मान्य करत नाही तो पर्यंत एकाही दूध उत्पादक शेतकऱ्याने आपले दूध डेअरीला घालू नये असे आम्ही आवाहन केले आहे. तसेच आम्ही दूध दरवाढी संदर्भात जिल्ह्यातील आमदारांना सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मागण्या सादर करण्याची विनती निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार काल विधान परिषदेचे आमदार तथा माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत दूध उत्पादकांच्या मागण्या मांडून सरकारने यावर लवकर तोडगा काढावा, असे सांगितले. तसेच आमदार सुरेश अण्णा धस यांनी देखील संपाऊर्ण महाराष्ट्रातील दूध उत्पादकाचा प्रशन अधिवेशनात सादर केला आहे. त्यामुळे त्यांचे व आमदार शिंदे यनचे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानत असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड उत्तरचे अध्यक्ष प्रमोदसिह जगदाळे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.
‘या’ आहेत प्रमुख चौदा मागण्या
१) गाईच्या दुधाला ४० रुपये प्रतिलिटर व म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रतिलिटर दर मिळावा.
२) पशुखाद्याचे दर कमी करावेत किंवा रासायनिक खत युरियाला ज्या पध्दतीने शासकीय अनुदान देण्यात येते, त्या धर्तीवर पशुखाद्यालाही अनुदान देण्यात यावे.
३) दुध उत्पादक शेतकऱ्यांना या व्यवसायाची शाश्वती मिळेल यासाठी शासनाने ठोस “दुध धोरण’ तयार करावे.
४) इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याने दुधाचा स्वतःचा एक ब्रँड विकसीत करावा.
५) दुधाला ऊसाप्रमाणे ८०-२० फॉर्म्युला आणून एफ. आर. पी. कायदा लागू करावा.
६) दुधामधील खासगी व सहकारी लुटमार विरोधी कायदा करावा.
७) सदोष मिल्क मिटरमधून होणारी लुटमार थांबवावी.
८) सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी दुध संघाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्याप्रमाणेच दुधाला दर द्यावेत.
९) तालुकावार मिल्कोमीटर टेस्टींग तपासणी भरारी पथक नियुक्त करावे.
१०) शासनाची जनावरे विमा योजना पुन्हा सुरु करावी.
११) राज्यातीली दुध दर निश्चित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीमध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व दुध उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करावा.
१२) दुध भेसळ रोखण्यासाठी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीमध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व दुध उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करावा.
१३) महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी दुध संस्था / दूध संघांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९अ अन्वये या कायद्याचे पालन न करणाऱ्या दुध संघावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
१४) शासनाकडून दुध उत्पादकांना मिळणारे प्रतिलिटर अनुदान तातडीने दुध उत्पादकांच्या बैंक खात्यात जमा करावे.