सातारा प्रतिनिधी । सातारा – पुणे महामार्गावर खंबाटकी बोगद्यात स्विफ्ट कारच्या (MH-01 -BG-7760) बोनेटवर लोखंडी अँगल आदळल्याची घटना गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पीएस टोलरोड, राष्ट्रीय प्राधिकरण आणि पोलिसांनी 3 तासांत बोगद्यातील रस्त्यावरील खांब बाजूला केल्याने खंबाटकी बोगद्यातील वाहतूक पूर्ववत झाली.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगद्यात कारवर पडलेल्या लोखंडी खांबामुळे वाहतूक रोखण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत संबंधित विभागाने सातारा बाजुकडून पुणे बाजुकडे खंबाटकी बोगदा मार्गे जाणारी वाहतूक बंद करत बोगद्यातील अँगल हटविण्याचे काम केले. तसेच आज शनिवारी दुपारी तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अँगल हटवून बोगद्यातील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
बोगद्यातील अँगल हटविण्यात आला असल्यामुळे शनिवार, रविवार सलग सुट्ट्या घेऊन पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे. खंबाटकी बोगद्यात काही वर्षांपूर्वी विद्युत सुविधेसाठी हे खांब वरच्या बाजूला लावण्यात आले होते. मात्र, यातील एक खांब अचानक निकामी झाल्याने कारवर कोसळला. मात्र, सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. कारचे मात्र, नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस पथकासह भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक गालिंदे, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, कृष्णकांत निंबाळकर, हवालदार डेरे, संतोष लेंभे या पोलिस कर्मचाऱ्यांसह पीएस टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. मोठ्या क्रेनच्या साह्याने सलग तीन तास सर्वांनी काम करून हा खांब बोगद्यातून हटविला.