कराड प्रतिनिधी | कृष्णा विश्व विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलमधील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक व वैद्यकीय उपचार सुविधा पाहून मी आश्चर्यचकीत झालो आहे. हे विद्यापीठ वैद्यकीय अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, सर्जनस् यांच्यासह एकूणच वैद्यकीय क्षेत्रासाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोसर्जिकल सोसायटीज्चे अध्यक्ष डॉ. लुईस बोर्बा यांनी काढले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित ‘न्यूरोकॉन २०२४’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. सुरेश भोसले होते.
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेसच्यावतीने आणि कृष्णा न्यूरोसर्जरी कोच यांच्या सहकार्याने कृष्णा विश्व विद्यापीठात ‘न्यूरोकॉन २०२४’ आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जगभरातील १५० हून अधिक मेंदू विकारतज्ज्ञ, तसेच न्युरोसर्जन तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. डॉ. लुईस बोर्बा यांच्या हस्ते व कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन करुन या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
व्यासपीठावर कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, शैक्षणिक व मानांकन विभागाचे प्रधान सल्लागार डॉ. प्रवीण शिंगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, मुंबईतील लिलावती हॉस्पिटलचे न्युरोसर्जन डॉ. अतुल गोयल, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेसचे संचालक डॉ. आईप चेरियन, प्रा. डॉ. जी. व्ही. रामदास उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कराडमध्ये १९८० साली किरकोळ स्वरुपाच्या वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध होत्या. या भागात एकही मोठे हॉस्पिटल त्या काळात नव्हते. अशावेळी १९८२ साली सामाजिक भावनेतून सामाजिक सुधारणांचे प्रणेते जयवंतराव भोसले आप्पांनी कृष्णा हॉस्पिटलची स्थापना केली. केवळ २०० बेडपासून सुरु झालेल्या या हॉस्पिटलमध्ये, सध्या रुग्णांसाठी उपलब्ध बेडची संख्या १४०० पर्यंत वाढली आहे. १९८४ ला मेडिकल कॉलेज सुरु करण्यात आले; जिथे विविध स्वरुपाचे १३५ अभ्यासक्रम राबविले जातात. कृष्णा विश्व विद्यापीठात आम्ही सुरवातीपासूनच संशोधनाला चालना दिली असून, इथल्या विद्यार्थ्यांमध्येही संशोधन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जागतिक पातळीवरील सर्वोत्तम सुविधा असलेली न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूट आम्ही सुरु करत असून, यासाठी डॉ. आईप चेरियन यांचे महत्वाचे योगदान लाभले आहे.
‘न्यूरोकॉन २०२४’ ही परिषद भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूरासर्जरी क्षेत्राला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. यावेळी शैक्षणिक व मानांकन विभागाचे प्रधान सल्लागार डॉ. प्रवीण शिंगारे यांनीही मार्गदर्शन केले.
दरम्यान, याप्रसंगी डॉ. आईप चेरियन, कोडेश्वरम् एम. आणि जे. के. बी. सी. पार्थिबन लिखित ‘ए प्रॅक्टिकल मॅन्युएल फॉर सिस्टेर्नोस्टॉमी’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम, दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. एन. जे. जाधव, डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, डॉ. एस. आर. पाटील, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, न्युरोसर्जरी विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी अर्चना कौलगेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. डॉ. आईप चेरियन यांनी स्वागत व प्रास्तविक केले. ज्योत्स्ना गांधी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी आभार मानले.