सातारा प्रतिनिधी | आपल्या आईचा डोळा चुकवून बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावात घडली. ऋतुराज रोहिदास गुजले (वय १४), वेदांत रोहिदास गुजले (वय १२, रा. हिवरे, ता. कोरेगाव), अशी मृत मुलांची नावे आहेत. रात्री उशीरा दोघांचे मृतदेह सापडले असून या घटनेमुळे कोरेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
शर्यतीला जातील म्हणून मुलांना शेतात नेले
रविवारी शाळेला सुट्टी आणि त्यातच किन्हई येथे बैलगाडी शर्यत असल्याने मुले शर्यतीकडे जातील, म्हणून आईने दोघांनाही जांभळा नावाच्या शिवारातील शेतात नेले होते. परंतु, बहुतांश ग्रामस्थ हे शर्यतीला गेल्यामुळे शिवारात फारसे लोक नव्हते. त्या परिसरात जलसंधारणातून बंधारे बांधण्यात आले आहेत. दुपारच्यावेळी ऋतुराज आणि वेदांत तेथील बंधाऱ्यात पोहत होते. त्यानंतर दोन्ही भावंडे आईबरोबर घरी गेली होती.
पुन्हा पोहायला गेली अन् बुडाली
आईचा डोळा चुकवून दोन्ही भावंडे पुन्हा पोहायला गेली. सायंकाळ झाली तरी दोन्ही मुले कुठे दिसेनात म्हणून मुलांची शोधाशोध सुरू झाली. मात्र, ती सापडत नव्हती. ग्रामस्थांनी नाईक इनाम नावाच्या शिवारापासून दोनशे फूटावर असलेल्या बंधाऱ्याकडे धाव घेतली असता बंधाऱ्याच्या काठावर दोन्ही मुलांची कपडे दिसली. काही तरूणांनी बंधाऱ्यात उड्या मारून मुलांचा शोध घेतला. रात्री उशीरा ऋतुराज आणि वेदांत या दोघांचेही मृतदेह सापडले.
मिठी मारलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह
ऋतुराज याला चांगले पोहता येत होते. मात्र, वेदांतला पोहता येत नव्हते. एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेतच दोघांचेही मृतदेह सापडले . यावेळी आई-वडील आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. मुलांचे वडिल रोहिदास गुजले हे ट्रॅक्टर चालक असून त्यांना दोनच मुले होती. याप्रकरणी निलेश महादेव गुजले यांनी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. हवालदार जाधव तपास करत आहेत.