सातारा प्रतिनिधी | जावळी तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलाने जन्मदात्रीवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी जावळी पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेनं सातारा जिल्हा हादरून गेलाय.
जावळी तालुक्यातील एका गावात व्यसनी मुलाने आपल्या आईवरच अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली असून न्यायालयाने त्याला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आनंदा मारूती सणस, असं नराधमाचं नाव आहे.
जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार
जावली तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या आनंदा मारुती सणस याने आपली आई किचनमध्ये काम करत असताना तिला पाठीमागून मिठी मारली. आईला फरशीवर पाडून जन्मदात्रीवरच अतिप्रसंग केला. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. मात्र, पीडित महिलेनं मेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन नराधम मुलाविरूध्द फिर्याद दिली. पोलिसांनी नराधम मुलाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नराधमाच्या कृत्याने जावळी तालुक्यात खळबळ
पोटच्या मुलाने जन्मदात्रीवर केलेल्या अत्याचाराने जावळी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. सामाजिक आणि सांप्रदायाची पार्श्वभूमी असणाऱ्या जावळी तालुक्याची मान शरमेनं खाली गेली आहे. या घटनेमुळे सर्व स्तरात संताप आणि चीड व्यक्त होत आहे.
जावळी तालुक्याला त्यागाचा वारसा
सातारा जिल्ह्यातील दुर्गम म्हणून ओळख असलेल्या जावळी तालुक्याला त्यागाचा तसेच ऐतिहासिक वारसा आहे. कोयना धरणाच्या निर्मितीमध्ये अनेक गावांनी त्याग केलाय. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जावळी तालुक्याला ऐतिहासिक वारसा आहे. नैसर्गिक वरदान आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जावळी तालुक्यात आशी निंदनीय घडना घडली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील या घटनेचा तपास करत आहेत.