कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील एका गावात थरारक आणि विचित्र घटना घडली आहे. बहिणीला कोंडून ठेवून मारहाण करणाऱ्या भाच्याला जाब विचारायला गेलेल्या मामावर भाच्यानेच सुऱ्याने वार केले. आणि आईलाही मारहाण केली आहे. या प्रकरणी संबंधित मारहाण करणाऱ्या भाच्यावर कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश जोतीराम पाटील (रा. नांदगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत सुनिल बाबुराव थोरात (रा. थोरात मळा, ओंड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंड येथील सुनिल थोरात हे सायंकाळी त्यांच्या घरी होते. त्यावेळी नांदगाव येथे राहत असलेली त्यांची बहिण विमल यांना त्यांचा मुलगा निलेश याने घरात कोंडून ठेवले असल्याचे सुनिल थोरात यांना माहिती मिळालाय. त्यामुळे सुनिल थोरात तातडीने नांदगावला गेले. त्यावेळी निलेश हा मद्यधुंद स्थितीत होता. सुनिल थोरात यांनी घराची बाहेरुन लावलेली कडी काढून बहिणीची सुटका केली.
तसेच आईला त्रास न देण्याबाबत ते भाचा निलेश याला समजावून सांगत होते. मात्र, त्याचवेळी चिडून जावून निलेश याने तुझा आमच्याशी काय संबंध, तु इकडे कशाला आला, असे म्हणून घरात जावून लोखंडी सुरा आणला. त्या सुऱ्याने त्याने सुनिल थोरात यांच्यावर जोरदार वार केला. हा वार हाताच्या पोटरीवर बसून थोरात गंभीर जखमी झाले. हातातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागल्यामुळे शेजाऱ्यानी थोरात यांना ओंड येथील रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी थोरात यांच्या हातावरील जखमेवर डॉक्टरांनी बावीस टाके घातले. याबाबत सुनिल थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निलेश पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार उत्तम खराडे तपास करीत आहेत.