कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ग्रामीण भागात किरकोळ कारणावरून मारामारीच्या घटना घडण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. दरम्यान, अशीच एक घटना कराड तालुक्यातील वाघेरी गावात बुधवारी सकाळी घडली. शेतात पाणी साचल्याने टाकलेल्या पाइपलगतचा दगड काढण्याच्या कारणावरून वाघेरी गावातील दोन कुटुंबांमध्ये जोरदार मारामारी झाली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी दुसऱ्या कुटुंबाची तक्रार दाखल करून घेण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सविता जालिंदर कणसे (रा. वाघेरी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरून हरिदास भानुदास कणसे, भानुदास खाशाबा कणसे, मंगल भानुदास कणसे, आबा भानुदास कणसे, ज्योती हरिदास कणसे आणि गीता आबा कणसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हरिदास कणसे यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली असून, सायंकाळपर्यंत त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू रात्री उशिरा सुरु होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील वाघेरी गावच्या हद्दीत कणसे मळा परिसरातील ‘समाध’ नावाच्या शिवारात जनावरांना वैरण आणण्यासाठी गेल्यानंतर पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेल्या पाइपला दगड लावल्याचे हरिदास यांना दिसून आले. त्यावेळी शेतात पाणी साचले असून, पाणी निघून जाण्यासाठी हरिदास कणसे यांना सविता कणसे यांनी पाइपला लावलेला दगड काढण्यास सांगितले होते.
त्यावेळी हरिदास कणसे यांनी त्यांना ढकलून दिले. त्यानंतर त्याठिकाणी सविता कणसे यांचे पती जालिंदर परशुराम कणसे, मुलगा संकेत आणि भाऊ समाधान दिलीप जाधव यांनी धाव घेतली. त्यावेळी हरिदास यांनी त्यांच्या जवळील कुऱ्हाडीच्या तुंब्याने दिलीप जाधव यांना मारहाण करत जखमी केले. तसेच अन्य संशयितांनी सविता कणसे यांच्यासह त्यांचे पती व मुलास मारहाण केल्याचे पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.