गाडी स्टार्ट केली अन् सीटखाली झाला स्फोट; साजूरमधील दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । इलेक्ट्रीक गाड्यांमुळे पेट्रोलचा खर्च वाचत असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाड्या कधी धोका देतील, हे सांगता येत नाही. कराड तालुक्यातील साजूर गावात आज (रविवारी) दुपारी याचाच प्रत्यय आला. कराडला निघालेल्या तरूणाने इलेक्ट्रीक गाडी स्टार्ट केली आणि गाडीतून धूर यायला सुरूवात झाली. गाडीवर बसणार इतक्यात सीटखालील बॅटरीचा स्फोट झाला आणि दुचाकीस्वार एका बाजूला पडला. सुदैवाने या दुर्घटनेतून तो थोडक्यात बचावला.

साजूर गावातील गणेश चव्हाण नावाच्या तरूणाने दीड वर्षापूर्वी बिलिंग-औरा कंपनीची इलेक्ट्रीक गाडी क्रमांक (एमएच- 50- टी- 4651) घेतली होती. दीड वर्ष ती व्यवस्थित चालली. मात्र, आज गाडी स्टार्ट करताच धूर निघायला लागला आणि गाडीच्या बॅटरीचा स्फोट झाला. तो सीटवर बसला असता तर मोठी दुखापत झाली असती. परंतु, सुदैवाने तो बचावला आहे.

बॅटरीचा स्फोट होताच गाडीची संपूर्ण सीट उद्ध्वस्त झाली. बॅटरी देखील जळाली. या घटनेनंतर तरूणांनी बादलीने गाडीवर पाणी मारले. इलेक्ट्रीक गाड्यांमधील बॅटरी जळाल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळाल्या होत्या. मात्र, बॅटरीचा स्फोट देखील होऊ शकतो, हेही आता पाहायला मिळाले. या संदर्भात गणेश चव्हाण हा तरूण कंपनीकडे तक्रार करणार आहे. दरम्यान, या घटनेनंतर ई बाईक वारणाऱ्यांना अधिक सावधानता बाळगावी लागणार आहे.