सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमचे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. मी मुख्यमंत्री झालो असलो तरी लोकांत मिसळून कार्यकर्त्याप्रमाणेच काम करतो, असे सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्याकडून दिव्यांग बांधवांच्या प्रश्न, समस्या यांच्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावातील निवासस्थानाबाहेर जिल्ह्यातील दिव्यांगांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करुन निवेदने दिली आहेत. मात्र त्यांच्या या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी अखेर मुख्यमंत्र्यांच्या दरे या मूळगावी जाऊन तेथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात अजय पवार यांच्यासमवेत नामदेव इंगळे, लतिका जगताप, अक्षय बाबर, पांडुरंग शेलार, सतीश जाधव, शैलेंद्र बोर्डे हेही सहभागी झाले आहेत.
याबाबत अजय पवार यांनी दिलेल्या निवेदनात केलेल्या मागण्यांमध्ये म्हटले आहे की, जिल्ह्यातील दिव्यांगांचा अनुशेष भरुन काढावा. दिव्यांग, निराधार, विधवायांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावी. प्रत्येक जिल्ह्यात दर महिन्याला पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांचा जनता दरबार घ्यावा, आदी मागण्या केल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. जिल्ह्यात दिव्यांग भवनासाठी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जागा व निधीची उपलब्धता करावी. तसेच शासन निर्णयानुसार दोनशे स्क्वेअर फूट जागा व्यवसायासाठी देण्याबाबतच्या प्रस्तावाला लवकर मंजूरी द्यावीत.
गणेश दुबळे हे प्राथमिक शिक्षक असून ते बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच सातारा पालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांच्यावर कधी कारवाई होणार तसेच आमची संस्था सहा वर्षे काम करत असताना 150 फुटावर दुसऱ्या संस्थेस कशी जागा दिली, याबद्दल पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यावर कारवाई करावी, आदी मागण्याही करण्यात आलेल्या आहेत.