सर्वात उंच उडणारा “पटेरी हंस” अन् पायलट फ्लेमिंगो सूर्याचीवाडीच्या तलावात दाखल

0
3

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पक्षी प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. हिमालय पर्वत ओलांडून स्थलांतरित करणाऱ्या पक्षांपैकी ‘पटेरी हंस’हा पक्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी येथील तलावामध्ये दाखल झाला असून हा ‘पटेरी हंस’ जगातील सर्वात जास्त उंच उडणाऱ्या पक्षांमधील एक पक्षी असून तशी त्याची नोंद आहे.पटेरी हंसाचे व फ्लेमिंगो पायलट (रोहित पक्ष्याची जोडी) सूर्याचीवाडी येथील तलावात आगमन झाले आहे.

पटेरी हंस (बार-हेड हंस) याचे दक्षिण आशियातील पर्वतीय तलावात वास्तव्य असते तो भारतात थंडीची चाहूल लागल्यानंतर स्थलांतरित करतो आणि मध्य आशियात प्रजनन करतो,अगदी दक्षिणेकडील दक्षिण भारतापर्यंत.हे घरट्यात एकावेळी तीन ते आठ अंडी देतात. हिमालय ओलांडताना स्थलांतर करणारा व जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी म्हणून त्याला ओळखले जाते. हिमालय ओलांडण्यापूर्वी ही प्रजाती तिबेट, कझाकस्तान, मंगोलिया आणि रशिया येथून दक्षिणेकडे गेल्याची नोंद आहे. पटेरी हंस (बार-हेड हंस) हिमालय पर्वतावर दक्षिण आशियाच्या काही भागात (आसाम ते तमिळनाडूच्या दक्षिणेस दक्षिण भागात) हिवाळा घालवण्यासाठी स्थलांतर करतात. हे पक्षी मुख्यत्वे तिबेट पठारावर घरटी करतात. हा पक्षी प्रेमळ आहे आणि इतर पक्ष्यांना त्रास देत नाही.

या आठवड्यात थंडी चाहूल सुरू झाल्याने हे पटेरी हंस सुर्याचीवाडी तलावात दाखल झाले असून पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर फ्लेमिंगो उर्फ रोहित पक्षांचे आगमन झाले आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून रोहित पक्षी सूर्याचीवाडी तलावात दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसातच हे पक्षी मायणी तलावात दाखल होतील. त्यामुळे खटाव तालुक्यासह परिसरातील पर्यटकांसाठी पक्षी पाहण्याची ही अनोखी संधी उपलब्ध झाली आहे.

पटेरी हंस, फ्लेमिंगो बरोबरच नाम्या, सुरुची, नकटा, चक्रवाक , शराटी, नदी सूरय, पाणकोंबड्या, चमचचोच्या, राखी बगळा, पांढऱ्या मानेचा करकोचा, टीबुकली, रंगीत करकोचा, जांभळी पाणकोंबडी, खंडय़ा, करकोचा, तूतवार, तापस तुतारी, आदी पक्षी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हिमालय ओलांडताना स्थलांतर करणारा व जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी म्हणून “पटेरी राजहंसला” ओळखले जाते. हिमालय ओलांडण्यापूर्वी ही प्रजाती तिबेट, कझाकस्तान, मंगोलिया आणि रशिया येथून दक्षिणेकडे गेल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे हा पटेरी राजहंस आपले खाद्य तलावाकडील असलेल्या गवतामध्ये शोधतात.

पटेरी हंस व अग्निपंखचे आगमन

मायणी पासून हाकेच्याउ अंतरावर असलेल्या सूर्याचीवाडी तलावात पटेरी हंस व अग्निपंखचे आगमन झाल्याने पक्षीप्रेमींचे तलावाच्या दिशेने पाऊले पडू लागली आहेत. गतवर्षाप्रमाणे याहीवर्षी पटेरी हंस व फ्लेमिंगोच्या आगमनामुळे निश्चितच खटाव तालुक्याच्या वैभवात पुन्हा भर पडणार आहे. सध्या मायणी,येरळवाडी व धोंडेवाडी ता.खटाव येथील तलावात पाणी साठा उपलब्ध असल्याने हजारो किलोमीटरचा प्रवास करत फ्लेमिंगोने हजेरी लावली असून पक्षीप्रेमी व निसर्ग मित्रांना याचा आनंद घेता येणार आहे.