पाचगणीतील हाॅटेल फर्नला उच्च न्यायालयाने ठोठावला 10 लाखांचा दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पाचगणी येथील हॉटेल द फर्नला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सील ठोकल्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईला आव्हान देणारी याचिका चांदणी रियाल्टी यांनी पाचगणी पालिकेविरोधात दाखल करण्यात आली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून हॉटेल फर्नला दहा लाखाचा दंड ठोठावला आहे. या निकालामुळे इतर अशा इमारती वापरकर्ते याची गंभीर दखल घेतील असा विश्वास पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत कारवाई आणि न्यायालय प्रक्रियेबाबत माहिती दिली. यावेळी जाधव म्हणाले की, पाचगणी येथे बांधलेली इमारत ही रहिवासासाठी असताना तिचा सरळ सरळ व्यवसायासाठी वापर केल्याचे निदर्शनास आल्याने पाचगणी नगरपालिकेने ही इमारत मे महिन्यात कडेकोट बंदोबस्तात सील केली होती. या मिळकतीचे सीलबंद केलेल्या कारवाईबाबत चांदणी रियाल्टी यांनी पाचगणी नगरपालिकेविरोधात न्यायालयात दाद मागितली होती.

ही याचिका फेटाळताना मुख्य इमारतीच्या टेरेसवरील विनापरवाना शेड तीन महिन्यांचे आत त्यांनी स्वतः स्वखर्चाने काढून घ्यावे आणि इमारतीचा वापर मंजूर नकाशात दाखवल्याप्रमाणे स्लोपिंग रूफ करावे. फक्त मुख्य इमारतीचे सील काढण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. तर मागील बाजूला असणारी मिळकतीचे सीलबंद कायम राहणार आहे. परंतु मुख्य इमारतीचे सील काढताना इमारत वापर हा फक्त रहिवासासाठीच करणे बंधनकारक राहील.

इमारतीची उंची ३० फूट मर्यादेत असेल. दरम्यान, याचिकाकर्त्याने ब्रेड अँड बटरचे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे दोन रूमचे लायसन्स
काढून तब्बल ७० रूमच्या माध्यमातून व्यावसायिक वापर केला. यामुळे उच्च न्यायालयाने दहा लाख रुपयांचा निधी कीर्तीकर लॉ लायब्ररीसाठी दोन आठवड्यात जमा करावेत, असे आदेश पारित करण्यात आल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले.