हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्ह्यात सर्वत्र फडकला तिरंगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी या उद्‌देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत या अभियानांतर्गत आज जिल्ह्यातील 1 हजार 496 ग्रामपंचायतींमध्ये, सर्व प्रांत, तहसील, पंचायत समिती कार्यालये, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. तसेच तिरंगा शपथ घेण्यात आली.

यावेळी सातारा जिल्ह्यात ठिकाणी तिरंगा रॅलीचेही आयोजन करण्यात आले. आजपासून 15 ऑगस्टपर्यंत तिरंगा यात्रा, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा मानवंदना, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा दौड, तिरंगा कॅनव्हास आदी कार्यक्रमांचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे.

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांवर, दुकाने, खासगी आस्थापना व सर्वशासकीय कार्यालयांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये नागरिकांनी तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून तो https://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.