सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या हद्दीवर महादरीचे जंगलात रविवारी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सातारा शहराजवळ महादरे संरक्षण राखीव या जंगलात रानडुकराच्या शिकारीत वापरलेली बंदूक वनविभागाच्या हाती लागली आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच जंगलात रविवारी काही पोलीस कर्मचारी सरावाचा भाग म्हणून महादरेच्या पायऱ्या चढून यवतेश्वर नजीकच्या पठारावर निघाले होते. त्यावेळी गंभीर जखमी अवस्थेतील एक रानडुक्कर पोलिसांना धावताना दिसले. त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला.
वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत रानडुकराने प्राण सोडला होता. त्याच्या डोळ्यात बंदुकीची गोळी लागली होती. दरम्यान, घटनास्थळी वन अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत एका झुडपामध्ये शिकारीसाठी वापरलेली बंदूक आढळून आली. याच बंदुकीने शिकाऱ्यांनी नेम साधला असावा. पोलीस व वनविभागाची धावपळ पाहून शिकारी बंदूक लपून पळाले असावेत, असा कयास आहे.
याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाशी संपर्क साधला असून बंदुकीवरून त्याच्या मालकाचा शोध सुरू आहे. रानडुक्कराची शिकार केल्याचे सिद्ध झाल्यास ३ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, अशी कायद्यात तरतूद आहे.