सातारा प्रतिनिधी | शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचे निमित्त साधून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे यावर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील अजिंक्यताऱ्यासह २४ किल्ले निवडण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवराज्याभिषेक ही हिंदुस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठी आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. यावर्षी या घटनेला ३५० वर्षे होत आहेत. हे निमित्त साधून हा उपक्रम हाती घेतला आहे. सातारा ही मराठ्यांची शेवटची राजधानी. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख किल्ल्यांवर यावर्षी ध्वजारोहण होत आहे. यासाठी रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण मंडळाने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या कार्यवाह मानसी वैद्य आणि अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी सर्व सातारकरांनी या उपक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही केले आहे.
सातारचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गिर्यारोहक व एव्हरेस्टवीर आशिष माने म्हणाले, दि. २६ जानेवारीला साताऱ्यातील स्थानिक गिर्यारोहक निवडलेल्या किल्ल्यावर चढाई करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवणार आहेत. तर सातारच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर सकाळी साडे आठ वाजता सातारचे असलेले आणि आता दक्षिण कमांडचे प्रमुख ब्रिगेडियर विजय जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.