कराड प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्षांचे पहिले प्रशिक्षण टाऊन हॉल कराड येथे आज पार पडले. यावेळी प्रशिक्षण कालावधीत जे नियुक्त कर्मचारी गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला.
कराड येथे आज पार पडलेल्या प्रशिक्षण वर्गास कराड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अतुल म्हेत्रे यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या. यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील यांची उपस्थिती होती. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात प्रशिक्षण पार पडले. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले, सुरुवातीला मतदान केंद्रावर जाताना आपले पथक व पोलीस कर्मचारी बरोबर असेल तरच निघावे. तत्पूर्वी सर्व साहित्य तपासून घ्यावे. ज्या केंद्रावर आपण नियुक्त आहोत तेथील सर्व सोयी सुविधा पहाव्यात. दिलेल्या सूचनांप्रमाणे केंद्राची मांडणी करावी.
आपण काय करतोय याचे रिपोर्टिंग केंद्र सरकारचे सूक्ष्मनिरीक्षक (मायक्रो ऑब्जर्वर) करणार आहेत. त्यासाठी 50 टक्के मतदान केंद्रावर वेब कास्ट बसवले जाणार असून तेथील लाईव रेकॉर्ड होणार आहे. त्यामुळे आपले केंद्र वेब कास्ट आहे का याची खात्री करावी. यावेळी मतदाराच्या ओळखीसाठी आवश्यक असणाऱ्या 12 पुराव्यांबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच 100 मीटरच्या आत उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते थांबवता येणार नाहीत. कोणी गैरशिस्त केल्यास 131 कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो याची जाणीव करून द्यावी. याबरोबरच केंद्रात कोणाला प्रवेश देता येतो याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.
अधिकाऱ्यांनी अभिरुप मतदान चाचणी वेळेत सुरू करावी, आदल्या दिवशीच उमेदवारांच्या प्रतिनिधींना सकाळी लवकर उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात व सकाळी 15 मिनिटे वाट पाहून जे उपस्थित आहेत त्यांच्यासमोर व जे नाहीत त्यांच्याशिवाय मॉकपोल वेळेत सुरू करावे. मॉक पोलच्या चिट्ठ्या दिलेल्या काळ्या लिफाफ्यात सील करा. त्यानंतर पोलिंग एजंटांच्या सह्या घेऊन एबी सिल, स्पेशल टॅग व ॲड्रेस टॅग लावून मतदान यंत्रे सील कराव्यात, असे सांगून मतदान सुरू करतेवेळी व बंद करतानाचे घोषणापत्र अचूक भरावे, अशा सूचना म्हेत्रे यांनी यावेळी केल्या. दरम्यान, प्रशिक्षणानंतर नियुक्त सर्व केंद्राध्यक्षांना टाऊन हॉल समोरील श्री शिवाजी विद्यालयात सेक्टर अधिकारी व मास्टर ट्रेनर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष हँड्स ऑन ट्रेनिंग देण्यात आले.