सातारा प्रतिनिधी । शिवजयंती महोत्सव समिती सातारा यांच्या वतीने दि. १७ ते १९ फेब्रुवारीअखेर शाहू कलामंदिर येथे पहिल्या शिव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ रोजी सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.
या कार्यक्रमाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, आयसीसीआर नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांची उपस्थिती आहे. दि. १७ रोजी सकाळी सौरभ कर्डे, शैलेश वरखडे, पियुषा भोसले यांचा पाेवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
यानंतर ‘छत्रपती युद्धनीती’ या विषयावर मोहन शेटे, छत्रपतींची दुर्गनीती या विषयावर प्रा. प्र. के. घाणेकर यांचे मार्गदर्शन सत्र होणार आहे. तसेच अफजलखान वध प्रसंग सारंग मांडके, सारंग भोईरकर सादर करणार आहे. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
उंट-घोडे,केरळी वाद्यांचा सहभाग
दि. १८ रोजी सायंकाळी गड पूजन व किल्ले अजिंक्यतारा येथे मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तर दि. १९ रोजी शिवजयंतीच्या मुख्य दिवशी सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. केरळचे १०० कलाकार केरळी वाद्यांसह शोभायात्रेत सहभागी होत आहेत. शोभायात्रेत गजीनृत्य, ढोल-ताशा पथक, तुतारी, हलगी वादन तसेच अन्य कलाकार आपली कला सादर करणार आहेत. उंट-घोडे शोभायात्रा मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे.