सातारा प्रतिनिधी । सध्या आरोग्य विभागाकडून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात आहे. ताप थंडीसह खोकल्याचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून अशा रुग्णावर उपचार देखील केले जात आहेत. अशात कोरोनाचे रुग्ण देखील इतर जिल्ह्यात आढळत असल्याने सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असताना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे जिल्ह्यातील पहिला महिला कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेकडून युद्धपातळीवर टिपण्याची मोहीम राबविली जाऊ लागली आहे.
सातारा जिल्ह्याशेजारी असलेल्या सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्ण आढळले असून, शहरातील विश्रामबाग परिसरात दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटबाबत चर्चा सुरू असतानाच सांगलीतही रूग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील पती-पत्नीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर १४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने बैठक घेत उपचाराबाबत नियोजन केले आहे. या पाठोपाठ आता सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून या गावात घरोघरी आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसापासून पुसेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याकडून घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याबाबत तपासणी केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला आदींसह महत्वाच्या आजाराबाबत आढळणाऱ्या रुग्णांना तत्काळ उपचार करण्याचा सल्ला संबंधित आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून दिला जात आहे.
दरम्यान, पुसेगाव येथे घरगुती आरोग्य तपासणीवेळी काही नागरिकांचे नमुने घेण्यात आले होते. यात गावातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून तिची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.