झाडाणी प्रकरणी ‘या’ दिवशी होणार अंतिम सुनावणी; चंद्रकांत वळवींनी दिली कबुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या राज्यात गाजत असलेल्या महाबळेश्वरमधील झाडाणी येथील तब्बल ६२० एकर जमीन व्यवहार प्रकरणी आज गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीस गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी स्वतः उपस्थिती लावली. त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर काही कागदपत्रे सादर केली तर उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी व म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. जीवन गलांडे यांनी दि. २९ जुलैला सर्व कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले असून याच दिवशी या प्रकरणाची अंतीम सुनावणी होणार आहे. मात्र,अखेर चंद्रकांत वळवी यांनी आपण कमाल जमीन कायद्याचे उल्लंघन केले असून शासन नियमानुसार कार्यवाही करत असल्याचे सांगितले.

सातारा येथील अप्पर जिल्हाधिकारी गलांडे यांच्यासमोर आज पार पडलेल्या सुनावणीसाठी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी उपस्थित राहत झाडानी प्रकरणी आपले म्हणणे सादर केले. अप्पर जिल्हाधिकारी यांच्यापुढे सुनावणी पारपडल्यानंतर वळवी यांनी कार्यालयाबाहेर येत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत वळवी म्हणाले, या व्यवहारात कमाल जमीन कायद्याचा उल्लंघन झाले आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार सध्या कार्यवाही सुरू आहे. शासन योग्य ते निर्णय घेईल. सुनावणीला हजर रहावे लागत असले तरी सर्वसामान्य लोकांनाही या प्रसंगाला सामोरे जावे लागते, तसेच आम्हीही या प्रसंगाला सामोरे जावू, असे वळवी यांनी म्हंटले.

लवकर निकाल अपेक्षित : सुशांत मोरे

महाबळेश्वर येथील झाडानी प्रकरणी यापुर्वी चार तारखा झाल्या आहेत. आज चंद्रकांत वळवी यांनी त्यांच्या राज्यातील अर्थसंकल्प असल्याचे कारण देत उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली आहे. या प्रकरणी अप्प्पर जिल्हाधिकारी यांनी शेवटची संधी देत २९ जुलैला सर्व कागदपत्रांनिशी हजर राहण्यास सांगितले आहे. याबाबत सुशांत मोरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. वळवी यांनी उर्वरित कागदपत्रे मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे. या प्रकरणाकडे देशाचे लक्ष लागले असून प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागणे अपेक्षित असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून शेवटची संधी

झाडाणी येथील ६२० एकर जमीन व्यवहारप्रकरणी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांच्यासह आणखी आठ जणांना नोटीस काढली होती. याप्रकरणी ११ जून, २० जुन रोजी सुनावणी झाली तर ३ जुलैची सुनावणी रद्द हाेवून ११ जुलैला सुनावणी घेण्यात आली. त्यानुसार चंद्रकांत वळवी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात हजर झाले. यावेळी नोटीस बजावलेले संबंधित हजर होते. त्यांनी काही कागदपत्रे सादर केली व उर्वरित कागदपत्रे सादर करण्यास पुढील तारीख मागितली. जीवन गलांडे यांनी शेवटची संधी देत असच्याचे सांगत दि. २९ रोजी सर्व कागदपत्रांनिशी हजर राहण्यास सांगितले.